Narhari Zirwal : राज्यात अन्न पदार्थांमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी सरकार कठोर पावले उचलत आहे. अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांनी विधानपरिषदेत स्पष्ट केले की, अन्न पदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा (मकोका) अंतर्गत कारवाई करण्यात येईल. हे पाऊल अन्नसुरक्षेला अधिक बळकट करण्यासाठी आणि संघटित भेसळ टोळ्यांवर दबाव आणण्यासाठी महत्त्वाचे मानले जात आहे. विधानपरिषदेत प्रश्नोत्तर तासात चर्चा शिवसेना आमदार डॉ. मनिषा कायंदे यांनी विधानपरिषदेत अन्न भेसळीच्या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित केला होता. या चर्चेत सदस्य भाई जगताप, ॲड. अनिल परब, अमोल मिटकरी आणि कृपाल तुमाने यांनी उपप्रश्न विचारून सहभाग घेतला. प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान मंत्री झिरवाळ (Narhari Zirwal) यांनी भेसळीच्या प्रकरणांना संघटित गुन्हेगारीचा भाग मानून मकोका लागू करण्याची घोषणा केली. “भेसळ हे साधे गुन्हे नाहीत, तर ते संघटित गुन्हेगारीचे स्वरूप आहे. अशा रॅकेट्सवर कठोर कारवाई होईल,” असे ते म्हणाले. Narhari Zirwal दुधातील भेसळ प्रकरणी मोठी कारवाई मंत्री झिरवाळ यांनी दुधातील भेसळ प्रकरणाचा विशेष उल्लेख केला. वसई आणि अंधेरी परिसरात अन्न व औषध प्रशासनाने टाकलेल्या छाप्यात दुधातील भेसळ सापडल्याने १४ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापैकी चार जणांना तडीपार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मुंबईसह मोठ्या शहरांत बाहेरून येणाऱ्या दूध पुरवठ्यावर विशेष लक्ष ठेवण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. मनुष्यबळ वाढवण्यासाठी प्रयत्न अन्न व औषध प्रशासन विभागातील मनुष्यबळ वाढवण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. विभागाकडील पद भरतीसाठी वित्त विभागाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. अलीकडेच १९७ कर्मचाऱ्यांची भरती करून त्यांना प्रशिक्षणानंतर पदस्थापना देण्यात आली आहे. सुगंधित सुपारी (फ्लेवर्ड सुपारी) प्रश्नाच्या संदर्भात लवकरच बैठक घेतली जाईल, असेही मंत्री झिरवाळ यांनी स्पष्ट केले. हे पाऊल राज्यातील अन्नसुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे. भेसळीच्या प्रकरणांमुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याने सरकारने कठोर धोरण अवलंबले आहे. मकोका सारख्या कायद्याच्या अंमलबजावणीमुळे भेसळ (Narhari Zirwal) टोळ्यांवर मोठा दबाव येण्याची शक्यता आहे.