Narhari Zirwal : मंत्री नरहरी झिरवाळ लाचखोरी प्रकरणात मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान
Narhari Zirwal : अन्न व औषध प्रशासन विभागातील लाचखोरी प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री नरहरी झिरवाळ यांना क्लीन चिट दिली आहे.

Narhari Zirwal : अन्न व औषध प्रशासन विभागातील कथित लाचखोरी प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री नरहरी झिरवाळ यांना क्लीन चिट दिली आहे. मंत्र्यांविरोधात कोणताही ठोस पुरावा समोर आलेला नसल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
अन्न व औषध प्रशासन विभागातील कर्मचारी राजू ढेरिंगे याला लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडल्यानंतर या प्रकरणाची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. त्यानंतर मंत्री झिरवाळ यांचं नावही चर्चेत आलं.
“पुरावे असते तर कारवाई झाली असती” : फडणवीस
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “मी अँटी करप्शन ब्युरोला पूर्ण स्वातंत्र्य दिलं आहे. मंत्र्यांच्या विरोधात पुरावा असता तर नक्कीच कारवाई झाली असती. एसीबी कारवाईपूर्वी सर्व माहिती गोळा करते, संभाषणांची नोंद घेते. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार मंत्र्यांचं नाव कुठेही आलेलं नाही,” असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
अधिवेशनात मुद्दा गाजण्याची शक्यता
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तोंडावर हे प्रकरण समोर आल्याने विरोधकांकडून यावर गदारोळ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सोमवारपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित केला जाऊ शकतो. दरम्यान, मंत्री नरहरी झिरवाळ यांनीही विभागातील चौकशी सुरू असून, “सर्व प्रश्नांना उत्तर देण्यास तयार आहे,” असं स्पष्ट केलं आहे.
खासगी सचिवावर कारवाई
या प्रकरणात झिरवाळ यांचे खासगी सचिव रामदास गाडे यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात आली आहे. त्यांना अन्न व औषध प्रशासन विभागातून कार्यमुक्त करून त्यांच्या मूळ आस्थापनेत पशुवैद्यकीय विभागात पाठवण्यात आलं आहे.
एकीकडे मुख्यमंत्र्यांनी झिरवाळ यांना दिलेल्या क्लीन चिटमुळे सत्ताधारी पक्षाला दिलासा मिळाला असला, तरी अधिवेशनात या मुद्द्यावर राजकीय वातावरण तापण्याची शक्यता नाकारता येत नाही.




