नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जेरुसलेममध्ये निष्पाप नागरिकांवर झालेल्या निर्घृण दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. भारत सर्व प्रकारच्या दहशतवादाचा निषेध करतो आणि दहशतवाद अजिबात सहन न करण्याच्या धोरणावर ठाम आहे, असे मोदी म्हणाले. आम्ही पीडितांच्या कुटुंबियांसाठी आमच्या संवेदना मनापासून व्यक्त करतो आणि जखमी लवकर बरे होण्याची इच्छा करतो, असेही पंतप्रधानांनी सोशल मीडियावरच्या आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. काल जेरुसलेममधील रामोट जंक्शन येथे झालेल्या गोळीबारात पाच जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेत चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर पाचव्याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या हल्ल्यात किमान सात जण गंभीर जखमी झाले आहेत, असे इस्रायलच्या राष्ट्रीय आपत्कालीन वैद्यकीय सेवेचे व्यवस्थापक मॅगेन डेव्हिड अॅडोम यांनी सांगितले. दोन्ही हल्लेखोरांना एका सैनिकाने आणि एका सशस्त्र नागरिकाने गोळ्या घालून ठार मारले. दोन्ही दहशतवाद्यांना संपवण्यात आल्याच्या वृत्ताला पोलिसांनी दुजोरा दिला आहे.