गोलघाट (आसाम) : भारत सध्या जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था आहे. देशाची प्रगती होत असताना वीज, वायू आणि इंधनाची मागणीही वाढत आहे. देशात कच्चे तेल आणि वायूचे नवीन साठे शोधण्याचे काम सुरू आहे, त्याचबरोबर हरित ऊर्जेची क्षमताही वाढवली जात असून ऊर्जा गरजांची पूर्तता करण्यासाठी आत्मनिर्भर बनण्याच्या मार्गावर भारताने वाटचाल सुरू केली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. आसाममधील गोलाघाट येथील नुमालीगढ रिफायनरी लिमिटेडमध्ये आसाम बायोइथेनॉल प्लांटचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. तसेच पंतप्रधान मोदींनी आज आसामध्ये १८,५३० कोटी रूपयांहून अधिक किमतीच्या पायाभूत सुविधा आणि औद्योगिक विकास योजनांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर निशाणा साधला. नरेंद्र मोदी म्हणाले, भारत दीर्घकाळापासून या ऊर्जाविषयक गरजांसाठी परदेशी स्रोतांवर अवलंबून असल्याने मोठ्या प्रमाणात कच्चे तेल आणि वायू आयात करत आहे. परिणामी, देशाला दरवर्षी इतर देशांना लाखो कोटी रुपये द्यावे लागतात, ज्यामुळे परदेशातील रोजगार आणि उत्पन्न वाढत आहे, यावर त्यांनी भर दिला. भारताने आता आपल्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आत्मनिर्भर होण्याचा मार्ग स्वीकारला आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले. दशकभरापूर्वी भारत सौर ऊर्जा उत्पादनात खूप मागे पडला होता, पण आज भारत सौर ऊर्जेच्या क्षमतेच्या बाबतीत जागतिक पातळीवर पहिल्या 5 देशांमध्ये पोचला आहे. आजच्या सातत्याने बदलत असलेल्या काळात, तेल आणि वायू इंधनावरचे अवलंबित्व कमी करण्यासाठी पर्यायी इंधनाची आवश्यकता आहे. यासाठी इथेनॉल हा एक व्यवहार्य पर्याय असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली. बांबूपासून इथेनॉलची निर्मिती करणारा एक नवीन प्रकल्प आज सुरू केला असल्याची माहितीही त्यांनी दिली. मी भगवान शिवाचा भक्त आसामच्या दरांग येथे नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या दिवंगत आई हीराबेन मोदी यांच्याबद्दल झालेल्या शिवीगाळीवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवरून विरोधकांवर टीका केली. पंतप्रधान म्हणाले की, मी भगवान शिवाचा भक्त आहेत आणि शिव्यांचे विष गिळून टाकतील. १९६२ मध्ये चीनबरोबर जे युद्ध झाले, त्यानंतर पंडीत नेहरू जे म्हणाले होते, नॉर्थ ईस्टच्या लोकांचे त्या जखमा आजही बऱ्या झालेल्या नाहीत. त्या जखमांवर काँग्रेसची सध्याची पिढी देखील मिठ चोळण्याचे काम करत आहे.