Narendra Modi : जगातील प्रतिभेला भारताकडे आकर्षित करा; अंतराळ स्टार्टअप्सना मोदींचे आवाहन
भारताला जागतिक अंतराळ क्षेत्रातील नवोन्मेषाचे केंद्र बनविण्यासाठी खासगी अंतराळ क्षेत्राभोवती असे वातावरण निर्माण करा की, जगभरातील तरुणांना करिअरसाठी भारताची निवड करावीशी वाटेल, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी केले.

Narendra Modi : भारताला जागतिक अंतराळ क्षेत्रातील नवोन्मेषाचे केंद्र बनविण्यासाठी खासगी अंतराळ क्षेत्राभोवती असे वातावरण निर्माण करा की, जगभरातील तरुणांना करिअरसाठी भारताची निवड करावीशी वाटेल, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी केले.
शुक्रवारी २० अंतराळ स्टार्टअप्सच्या संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी संवाद साधताना मोदी यांनी भारताच्या कमी खर्चातील अंतराळ प्रक्षेपण क्षमता आणि मोठ्या प्रतिभावान मनुष्यबळाचे महत्त्व अधोरेखित केले. भारतातील तरुणांमध्ये जोखीम घेण्याची क्षमता अधिक असल्याने देश जागतिक अंतराळ क्षेत्रात वेगाने आघाडी घेऊ शकतो, असे त्यांनी (Narendra Modi) सांगितले.
अंतराळ क्षेत्र खासगी कंपन्यांसाठी खुले केल्यानंतर अमेरिका आणि युरोपमध्ये कार्यरत अनेक भारतीय नागरिक मायदेशी परतून काम करण्यास इच्छुक असल्याचे एका उद्योजकाने सांगितले. त्यावर मोदी यांनी भारतातील स्टार्टअप्स आणि अंतराळ संस्थांशी जोडण्यासाठी जगभरातील प्रतिभेला आकर्षित करण्याची गरज व्यक्त केली. ही प्रतिभा भारताकडे खेचणारा ‘चुंबक’ बनू शकते, असे ते म्हणाले.
सरकारच्या धोरणातील सातत्यामुळे जोखीम घेणाऱ्या उद्योजकांमध्ये विश्वास निर्माण झाला असल्याचेही मोदी यांनी नमूद केले. भारतात खर्चाच्या दृष्टीने मोठी स्पर्धात्मकता असून प्रतिभेची कोणतीही कमतरता नाही, असे त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय अंतराळ दिन
स्कायरूट एअरोस्पेसने भारताचे पहिले खासगी रॉकेट कक्षेत यशस्वीपणे प्रक्षेपित केले असून, २०२७च्या मध्यापर्यंत महिन्याला एक प्रक्षेपण करण्याचे लक्ष्य असल्याचे स्टार्टअप्सनी सांगितले. भविष्यात आठवड्याला एक आणि पुढे दररोज अनेक प्रक्षेपण करण्याचे उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी नमूद केले.
मोदी यांनी (Narendra Modi) अंतराळ तंत्रज्ञानाचा वापर शेती, पशुधन, दुग्धव्यवसाय आणि पर्यावरणासह दैनंदिन जीवनातील विविध क्षेत्रांत वाढविण्याचे आवाहन केले. २३ ऑगस्ट हा चांद्रयान-३च्या यशस्वी सॉफ्ट लँडिंगच्या स्मरणार्थ राष्ट्रीय अंतराळ दिन म्हणून साजरा केला जातो.






