नरेंद्र मोदींना झाली ‘शोले’ सिनेमाची आठवण; राहुल गांधींना डिवचलं, भागृहात बोलून दाखवला डायलॉग….

Narendra Modi । Rahul Gandhi । New Delhi : काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काल (दि. १) सभागृहात पहिले भाषण केले. यावेळी राहुल यांनी सभागृहात भगवान शंकराचे चित्र दाखवले, ज्यावर सभापती ओम बिर्ला यांनी आक्षेप घेतला. यावेळी राहुल गांधी यांनी अग्निवीर योजना, हिंदुत्व आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता.
त्यानंतर आज (दि. २) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत विरोधकांच्या गदारोळातच काँग्रेस व विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केली. यावेळी नरेंद्र मोदींनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतल्याचं दिसून आलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलत होते. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या लोकसभा निवडणुकीतील पराभवाचं विश्लेषण करत जोरदार हल्लाबोल केला. 13 राज्यात आमच्या शून्य जागा आल्या असं काँग्रेस सांगत आहे.
अरे शून्य जागा आल्या पण हिरो तर आम्हीच ना? आम्ही पक्ष तर बुडवला नाही ना? काँग्रेसच्या लोकांना सांगतो, लोकमताच्या खोट्या विजयाच्या उत्सवात राहू नका. इमानदारीने देशाचा कौल समजून घ्या. तो स्वीकार करा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं.
पंतप्रधान मोदींना झाली शोले चित्रपटाची आठवण :
काँग्रेसच्या घोषणाबाजीने शोले चित्रपटालाही मागे टाकले आहे. शोले चित्रपटातील ती मावशी तुम्हाला आठवत असेल. असे मौसीजी तिसरीबार ही तो हारे है, अरे मौसी पार्टी अभीभी सांसे तो ले रही है, असे मौसीजी तेरा राज्यों में शून्य सीटे आई है, पर हिरो तो है ना… असे डायलॉग मोदींनी सभागृहात बोलून दाखवले.
राहुल गांधींना बालक बुद्धी म्हणत लगावला टोला :
‘काल देशाने संसदेत बालिशपणा बघितला. देशाला माहिती आहे की हे लोक कोट्यवधींचा घोटाळा करून जामिनावर बाहेर आहेत. ओबीसींना शिव्या दिल्यामुळे यांना शिक्षा झाली आहे. यांच्यावर महान स्वातंत्र्य सेनानी वीर सावरकरांचा अपमान करण्याचा खटला सुरू आहे. यांच्यावर देशाची सगळ्यात मोठी पक्षाला हत्यारा म्हणण्याचा खटला सुरू आहे.
यांच्यावर अधिकारी आणि संस्थांबाबत खोटं बोलण्याचा आरोप आहे. बालक बुद्धीमध्ये ना बोलायचा ठावठिकाणा आहे ना बालक बुद्धीमध्ये वागायचा ठावठिकाणा आहे. ही बालक बुद्धी संसदेतही गळ्यात पडते, संसदेत डोळे मारते’, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधींना लगावला.
नरेंद्र मोदींची राहुल गांधींवर टीका :
‘लागोपाठ तिसऱ्यांदा काँग्रेस 100 चा आकडा पार करू शकली नाही. मला एक किस्सा आठवतो. एक बालक 99 मार्क घेऊन फिरत होता. सगळ्यांना मला किती जास्त मार्क मिळाले हे सांगत होता. लोकही 99 मार्क पाहून त्याला शाबासकी देत होते.
काहींनी विचारलं कोणत्या गोष्टीची शाबासकी देत आहात? याला 100 पैकी 99 नाही तर 500 पैकी 99 मार्क आले आहेत. यांना पाहून शोले चित्रपटाची मौसी आठवत आहे’, अशी टीकादेखील नरेंद्र मोदींनी राहुल गांधींवर केली.





