वर्धा – 96व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नरेंद्र चपळगावकर यांची निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची बैठक आज (8 नोव्हेंबर) वर्धात पार पडली. या बैठकीत 96 व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे.
ज्येष्ठ लेखक आणि विचारवंत सुरेश द्वादशीवार आणि उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश आणि वैचारिक लेखनासाठी प्रसिद्ध असलेले नरेंद्र चपळगावकर यांच्यामध्ये संमेलनाध्यक्षपदीसाठी चुरस होती. पण आज नरेंद्र चपळगावकर यांची अध्यक्षपदासाठी निवड करण्यात आली आहे.
या निवडीनंतर नरेंद्र चपळगावकर म्हणाले, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद हा मराठी भाषा मराठी साहित्य यांच्याबद्दल आपलं मत मांडण्याची मोठी संधी आहे, असं मी मानतो. ही संधी मला दिल्याबद्दल मी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे आभार मानतो.
दरम्यान, साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी माजी खासदार दत्ता मोघे यांची निवड करण्यात आली आहे. यंदाचे 96वे साहित्य संमेलन दि. 3, 4 आणि 5 फेब्रुवारी रोजी वर्धा येथील स्वावलंबी शाळेच्या भव्य मैदानात पार पडणार आहे.
राज्यातील प्रकल्पांना आशियाई विकास बँकेने सहाय्य करावे – मुख्यमंत्री शिंदे
नरेंद्र चपळगावकर यांचा अल्प परिचय?
नरेंद्र चपळगावकर हे वैचारिक लेखन करणारे एक संवेदनशील व सत्त्वशील लेखक म्हणून ओळखले जातात. ते मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे निवृत्त न्यायाधीश असून न्यायाधीश होण्यापूर्वी ते लातूरच्या दयानंद विज्ञान महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे पहिले प्रमुख होते. नरेंद्र चपळगावकर यांनी संघर्ष आणि शहाणपण, दीपमाळ, आठवणीतले दिवस आणि कायदा आणि माणूस यांसारख्या पुस्तकांचे लेखन केले आहे.