सुमारीवाला यांनी केली बात्रांची पाठराखण..

नवी दिल्ली – भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे (आयओए) अध्यक्ष नरेंद्र बात्रा व उपाध्यक्ष सुधांशू मित्तल यांच्यातील वादात भारतीय ऍथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष आदिल सुमारीवाला यांनी बात्रा यांची पाठराखण केली आहे.
आयओएमध्ये बात्रा व मित्तल यांच्यातील वादामुळे दोन गट पडले असून मित्तल यांनी बात्रा यांच्या नियुक्तीवरच प्रश्नचिन्ह उभे करताना आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेला पत्र लिहून आपला आक्षेप नोंदवला होता. बात्रा यांनी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीला सादर केलेली कागदपत्रे अवैध असून त्यांच्या नियुक्तीबाबतच शंका उपस्थित होते. एकाच वेळी ते दोन संघटनांचे पद कसे काय मिळवू शकतात, असा सवाल मित्तल यांनी केला होता. त्यावर सुमारीवाला यांनी बात्रांची बाजू घेत सर्व कागदपत्रे योग्य असून त्यांच्या नियुक्तीत कोणतीही अनियमितता झालेली नसल्याचे स्पष्ट केले आहे. बात्रा यांची चौकशी करण्यात यावी, अशी मित्तल यांनी केलेल्या मागणीवरही सुमारीवाला यांनी आक्षेप घेतला आहे.
मित्तल यांनी केलेले आरोप अर्थहिन असून बात्रा हे एक खेळाच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणारे प्रामाणिक व्यक्ती आहेत, असे सुमारीवाला यांनी स्पष्ट केले आहे. सुमारीवाला यांच्यासह हॉकी इंडियानेही बात्रा यांनाच समर्थन दिले आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघानेही बात्रा यांच्यावरच विश्वास व्यक्त केला असून मित्तल यांच्या आरोपांनाच काही अर्थ नसल्याचेही स्पष्ट केले आहे.





