Narcotic Drugs: नवी मुंबईत 2 कोटींचे अंमली पदार्थ जप्त

Narcotic Drugs – राज्यातील शहरी भागात अंमली पदार्थ विकले जात असल्याचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. आता ग्रामीण भागांमध्येही हे अंमली पदार्थ मिळू लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मुंबई आणि आसपासच्या शहरांमध्ये अंमली पदार्थ विक्रेत्यांचे जाळे असल्याचा सातत्याने आरोप केला जातो.
यांच्यापर्यंत अंमली पदार्थ कसे येतात हा मोठा प्रश्न आहे. या सर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलिसांनी एक मोठी कारवाई करत 1 किलोहून अधिकचे एमडी ड्रग्ज पकडले आहे.
नवी मुंबई पोलिसांनी अंमली पदार्थ विक्रेत्यांना हादरा देत मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी सलाउद्दीन अलाउद्दीन शेख, फजल जाफर खान या दोन आरोपींना अटक केली आहे.
त्यांच्याकडून 1 किलो 4 ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज जप्त केलेत. या अंमली पदार्थाची किंमत 2 कोटींहून अधिक असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. हे दोन्ही आरोपी मुंबईतील माहीम भागातील रहिवासी आहेत.
सायनकडून पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर वाशी गांव बस स्टॉपवर हे दोघे येणार असल्याची गुप्त खबर पोलिसांनी मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून या दोघांना अटक केली. हे अंमली पदार्थ या दोघांनी कुठून आणले याचा पोलीस शोध घेत आहेत.





