Narayangaon Bus Stand : बसस्थानक आहे की वाहनतळ? नारायणगाव एस.टी. डेपोला खासगी गाड्यांचा विळखा
Narayangaon Bus Stand : चहूबाजूंनी वेढलेल्या गाड्यांमुळे अपघाताची टांगती तलवार; अवैध पार्किंगला शिस्त लावण्यासाठी सर्वसामान्य नागरिक आक्रमक.

Narayangaon Bus Stand – पुणे-नाशिक महामार्गावरील मध्यवर्ती ठिकाण असलेले नारायणगाव येथील बसस्थानक खासगी वाहनाच्या पार्किंगच्या विळख्यात सापडले आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने अत्याधुनिक व सुसज्ज नवीन बसस्थानक उभारून प्रवाशांची गैरसोय दूर केली. या बसस्थानकामुळे नारायणगावच्या सौंदर्यातही भर पडली आहे. मात्र, बसस्थानक परिसरात चहूबाजूंनी खासगी वाहनांचे पार्किंग होत असल्याने बसस्थानकाचे रूपांतर वाहनतळात झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
नारायणगाव बसस्थानकातून दररोज शेकडो एसटी बस प्रवाशांची वाहतूक करतात. मात्र, बसस्थानक परिसरात पार्किंग केलेल्या खासगी वाहनांमुळे एसटी चालकांना बस वळवताना व मागे-पुढे घेताना मोठी कसरत करावी लागत आहे. अशा परिस्थितीत एखाद्या वाहनाला धक्का लागल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
पोलिसांची बघ्याची भूमिका
बसस्थानकाच्या आवारात नारायणगाव पोलिसांची चौकी असून पोलिसांच्या समोरच मोठ्या प्रमाणात खासगी वाहनांची पार्किंग होते. असे असतानाही पोलीस कोणतीही ठोस कारवाई करीत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. बसस्थानक आवारात अवैध पार्किंगमुळे एखादी दुर्दैवी घटना घडल्यास जबाबदार कोण, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
अवैध पार्किंगला शिस्त लावणार कोण?
आगार प्रमुखांना बसस्थानक परिसरात खासगी वाहनांना पार्किंग करण्यास परवानगी कशी दिली जाते, असा प्रश्न विचारल्यानंतर स्थानिक प्रशासनाचा दबाव असल्याचे जाणवत होते. आगार प्रमुखांनी पोलिसांना पत्रव्यवहार करूनही कारवाई होत नसेल, तर या अवैध पार्किंगला शिस्त लागणार कशी, असा संतप्त सवाल सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.





