पुणे जिल्हा | नारायणगाव-बोरी बस बंदच

बेल्हे, (वार्ताहर) – नारायणगाव आगाराची नारायणगाव-बोरी ही बससेवा गेल्या महिन्याभरापासून बंद असल्याने प्रवाशांचे अतोनात हाल होत असून प्रवासी संतप्त झाले आहेत. ही बससेवा जर लवकर सुरू न झाल्यास प्रवासी आक्रमक होतील, आणि त्यावेळी काही विपरीत घडल्यास एसटी प्रशासन त्यास कारणीभूत असेल असा इशारा प्रवाशांनी दिला आहे.
नारायणगाव आगाराची अनेक वर्षांपासून सुरू असलेली नारायणगाव -बोरी ही एसटी बस नारायणगाव आगारातून सकाळी 8.30वाजता व दुपारी 3.30 वाजता सुटत होती; परंतु काही महिन्यांपासून नारायणगाव आगाराच्या मनमानी अधिका-यांनी ही एसटी बंद केल्याने यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत.
एकीकडे एसटी प्रशासन एसटीचे उत्पन्न वाढवण्यासाठी विविध योजना राबवित असताना नारायणगाव आगाराच्या मनमानी कारभारामुळे एस टी महामंडळ तोट्यात येत आहे. या एसटीची फेरी ही सकाळी संध्याकाळी दोन्ही वेळेस आळेफाटा मार्गे असल्याने प्रवाशांची मोठी सोय प्रवासाची मोठी सोय झाली होती. तरी ही एसटी बस त्वरित सुरू करावी, अन्यथा शालेय विद्यार्थ्यांना सोबत घेऊन आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सुनील जाधव, पांडुरंग जाधव, राजेंद्र भोर यांच्यासह प्रवाशांनी दिला आहे.





