Narayan Rane : शंकराचार्यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर नारायण राणेंनी दर्शवली असहमती

मुंबई : शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी सिंधू नदीचे पाणी रोखण्याच्या भारताच्या क्षमतेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्या भूमिकेविषयी भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी रविवारी असहमती व्यक्त केली. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी मोदी सरकारने विविध निर्णय घेतले. त्यामध्ये सिंधू नदी पाणी करार स्थगितीचाही समावेश आहे.
संबंधित करार स्थगितीविषयी शंकराचार्यांनी भाष्य केले. सिंधू नदीचे पाणी रोखण्यासाठीची कुठलीही व्यवस्था नाही. तशा व्यवस्थेसाठी २० वर्षांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे सरकार जनतेला मूर्ख बनवतेय असे वाटतेयं, अशी टिप्पणी त्यांनी केली. त्यावर राणे यांनी प्रतिक्रिया दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या सुरक्षाविषयक निर्णयांवर जाहीरपणे बोलणे टाळायला हवे.
आम्ही शंकराचार्यांचा आदर करतो. पण, सुरक्षाविषयक निर्णयांवर त्यांनी भाष्य करू नये. देशापेक्षा कुणी मोठा नाही, असे राणे म्हणाले. पहलगाम हल्ल्यानंतर राजकीय वातावरणही तापले आहे. त्यातून राजकीय नेते विविध प्रकारच्या भूमिका मांडत आहेत. त्यामुळे वादंगालाही तोंड फुटताना दिसत आहे.





