Narhari Zirwal : नरहरी झिरवाळ यांची दिंडोरीतून विजयाची हॅट्रिक

नाशिक : दिंडोरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते आणि विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना तिसऱ्यांदा निवडणुकीसाठी तिकीट देण्यात आले. महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाने सुनिता चारोस्कर यांना मैदानात उतरवले होते. दिंडोरीत कोण बाजी मारणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र नरहरी झिरवाळ या मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा निवडून आले आहेत.
नरहरी झिरवाळ यांना 1,38442 मते मिळाली तर सुनीता चारोस्कर यांना 93910 मते मिळाली. नरहरी झिरवाळ यांना 44532 मतांनी विजयी घोषित करण्यात आले. दिंडोरी विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जमाती समुदायासाठी राखीव आहे. 2014 सालच्या विधानसभा निवडणुकीत दिंडोरी मतदारसंघात नरहरी झिरवाळ यांचा विजय झाला होता. विशेष म्हणजे 2014 मध्ये मोदी लाट असूनही ते निवडून आले होते.
नरहरी झिरवाळ यांनी दिंडोरी मतदारसंघावर वर्चस्व प्रस्थापित केल्याने शरद पवारांकडून त्यांना 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा संधी देण्यात आली. या निवडणुकीत त्यांना 1 लाख 24 हजार 520 मतं मिळाली होती. तर शिवसेनेने भास्कर गावित यांना तिकीट दिले होते. त्यांना 63 हजार 707 मतं मिळाली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर नरहरी झिरवाळ हे अजित पवारांच्या गटात दाखल झाले. अजित पवारांकडून नरहरी झिरवाळ यांना पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले. तर महाविकास आघाडीकडून सुनिता चारोस्कर यांना संधी देण्यात आली होती.





