Maharashtra Crime : नांदेड शहरात सोमवारी पहाटेच्या सुमारास सोनू कल्याणकर (३५) या ठाकरेसेना कार्यकर्त्याची चाकूने वार करून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर एका संशयिताला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत आरोपी गोळी लागून जखमी झाला आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. गेल्या तीन दिवसांत शहरात सार्वजनिक ठिकाणी झालेली ही पाचवी हत्या आहे. ( Maharashtra Crime ) सोनू कल्याणकर हे पहाटे ५.३० च्या सुमारास मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडला असताना श्रीनगर परिसरात तीन व्यक्तींनी त्याच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. त्याच्या शरीरावर चाकूचे १७ वार आढळून आले आणि जवळच्या रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या हत्येप्रकरणी चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अंकुश गंदमवार याला झरी परिसरात झालेल्या एका चकमकीनंतर ताब्यात घेण्यात आले. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला होता, परंतु पळून जाण्याच्या प्रयत्नात गंदमवारने गुन्हे शाखा पथकावर गोळीबार केला. पोलिसांनी केलेल्या प्रत्युत्तरादाखल गोळीबारात तो जखमी झाला. उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कल्याणकर याने अलीकडेच भाजप सोडून ठाकरेसेना पक्षात प्रवेश केला होता आणि तो या पक्षाच्या शहर युवा आघाडीचा अध्यक्ष होता. तीन वर्षांपूर्वीही त्याच्यावर एकदा हल्ला झाला होता, मात्र त्यातून तो सुखरूप बचावला होता. गेल्या तीन दिवसांत नांदेड शहरात सार्वजनिक ठिकाणी हिंसक घटनांची मालिकाच घडल्याचे दिसून येत आहे. गेल्या आठवड्यात दोन टोळ्यांमधील संघर्षात तीन जणांचा मृत्यू झाला होता, तर वजीराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका व्यक्तीची हत्या करण्यात आली होती. ( Maharashtra Crime )