नांदेड : नांदेड जिल्ह्यात मुदखेड तालुक्यातील जवळा मुरार गावातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी एका शेतकऱ्यासह त्याच्या पत्नी आणि दोन मुलांचे मृतदेह आढळले आहेत. ही सामूहिक आत्महत्या असल्याचा पोलिसांना संशय आहे. सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास, जवळा मुरार गावातील त्यांच्या घरात रमेश सोनाजी लाखे (५१) आणि त्यांची पत्नी राधाबाई लाखे (४५) यांचे मृतदेह आढळून आले. त्यानंतर त्यांचा मुले उमेश (२५) आणि बजरंग (२३) यांचे मृतदेह जवळच्या रेल्वे रुळांवर सापडले आहेत. त्यांनी भरधाव ट्रेनसमोर उडी मारल्याचे दिसत आहे. पोलीस निरीक्षक दत्तात्रय मंथळे यांनी सांगितले की, आई-वडील घरात मृतावस्थेत आढळले, तर मुलांनी रेल्वे रुळांवर आत्महत्या केली आहे. आम्ही फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या पथकाला पुरावे गोळा करण्यास सांगितले आहे. सखोल तांत्रिक तपास आणि शवविच्छेदनानंतरच सत्य समोर येईल. त्यांचा मृत्यू सामूहिक आत्महत्या असल्याचे दिसत असले तरी, नेमकी परिस्थिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. हे कुटुंब अल्पभूधारक शेतकरी समाजातील होते. परंतु आर्थिक अडचणीमुळे किंवा कौटुंबिक संकटामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले की नाही, हे अद्याप निश्चित झालेले नाही. लाखे कुटुंबीय मेहनतीने शेतीतील प्रतिकूल परिस्थितीशी झगडून आपला उदरनिर्वाह करत होते. नांदेड ग्रामीण पोलीस पुढील तपास करत आहेत.