Accident : नांदेड-भोकर मार्गावर काळाचा घाला! ट्रक-टाटा मॅजिकची भीषण धडक; ५ ठार, ८ जखमी
Accident : नांदेड-भोकर महामार्गावर सीताखंडी परिसरात ट्रक आणि टाटा मॅजिकची समोरासमोर धडक. अपघातात ५ जणांचा मृत्यू, ८ जण गंभीर जखमी.

Accident : नांदेड-भोकर महामार्गावर ट्रक आणि टाटा मॅजिकची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला, तर आठ जण गंभीर जखमी झाले. हा अपघात गुरुवारी (१० सप्टेंबर) संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास वाकद गावाजवळील सीताखंडी परिसरात झाला. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
नेमका अपघात कसा झाला?
प्राथमिक माहितीनुसार, ट्रक भोकरकडून नांदेडच्या दिशेने जात होता. त्याचवेळी १५ प्रवासी असलेली टाटा मॅजिक व्हॅन विरुद्ध दिशेने येत होती. सीताखंडी परिसरात दोन्ही वाहनांची जोरदार समोरासमोर धडक झाली. धडक एवढी भीषण होती की टाटा मॅजिकचा मोठा चक्काचूर झाला.
जखमींना रुग्णालयात दाखल
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पोलिसांना आणि रुग्णवाहिकेला माहिती दिली. नागरिकांच्या मदतीने जखमींना बाहेर काढण्यात आले. आठ जखमींना भोकर आणि नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
ट्रकचालकही केबिनमध्ये अडकला
या धडकेत ट्रकच्या पुढील भागाचेही मोठे नुकसान झाले. ट्रकचालक केबिनमध्ये अडकला होता. त्याला बाहेर काढण्यासाठी पोलीस आणि स्थानिक नागरिक प्रयत्न करत होते.
या अपघातातील मृत आणि जखमींपैकी बहुतांश जण स्थानिक रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. अपघाताचे नेमके कारण काय, तसेच वाहनांच्या वेगाबाबत पोलीस तपास करत आहेत.





