नाना पटोलेंच्या गळ्यात ‘भावी मुख्यमंत्री’ लिहिलेली वीणा ; भुजबळ-पवार यांच्या भेटीवर केले परखड भाष्य

Nana Patole । काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विठ्ठल दर्शनासाठी आले असता काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांच्या गळ्यात चक्क भावी मुख्यमंत्री लिहिलेली वीणा घातली, त्यानंतर नानांनी थेट ही वीणा गळ्यात घेऊनच देवाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी “वेळेच्या आणि नशिबापेक्षा जास्त काही मिळत नाही, ही राजकीय गुरू विलासराव देशमुख यांची शिकवण मी डोक्यात ठेवली आहे. माझ्या नशिबात असेल तर जे व्हायचे ते होईल,” असे म्हणत नाना पटोले यांनी आपण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाबाबत आशावादी असल्याचे संकेत आज विठ्ठल मंदिरातून दिले आहेत.
नाना पटोलेंनी कार्यकर्त्यांनी फेटाही घातला आणि वीणाही कार्यकर्त्यांनी घातल्याचे सांगत नशिबात जे असेल ते होईल, असे त्यांनी यावेळी म्हटले. तसेच पुढे बोलताना नाना पटोले यांनी,”मला सध्या पेटत असलेला महाराष्ट्र शांत करायचा आहे, महाराष्ट्राला पूर्वीचे सोन्याचे दिवस आणायचे आहेत. माझी लढाई खुर्चीची नाही तर महाराष्ट्राच्या विकासाची आणि जनतेच्या हिताची असल्याचे एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले.
लोकसभेच्या विजयानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला असून आज नाना पटोले आषाढी वारीच्या निमित्ताने विठ्ठल दर्शनासाठी आले असता त्यांच्या गळ्यात चक्क भावी मुख्यमंत्री लिहिलेली वीणा घालण्यात आली. नाना पटोले हे पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी आले होते. यावेळी काँग्रेस कार्यकर्ते आणि धवलसिंह मोहिते पाटील मित्रमंडळ यांच्याकडून भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असणारी वीणा नाना पटोले यांच्या गळ्यात घालण्यात आली. विधानसभा निवडणुका जवळ येत असताना आता नाना पटोले यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून थेट पंढरीच्या वारीत झालेल्या उल्लेखाने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
भुजबळ-पवार भेटीवरही परखड भाष्य Nana Patole ।
राज्यातील शिंदे सरकारवर सडकून टीका करत, राज्य सरकारनेच महाराष्ट्र पेटवला असा थेट आरोप पटोले यांनी केला आहे. सरकार सत्ता चालवायच्या लायकीचे नाही, आज त्यांच्याच एका जेष्ठ मंत्र्यांनी हे दाखवून दिल्याचा टोलाही त्यांनी लगावला. भुजबळ आणि पवार यांच्या आजच्या भेटीचा उद्देशच तो होता, हे सरकार लायकीचे नाही हेच त्यांनी दाखवून दिल्याचं पटोले यांनी म्हटलं.
संघर्ष संपवायचे सोल्यूशन आमच्याकडे Nana Patole ।
मराठा-ओबीसी संघर्ष संपवायचे सोल्युशन आमच्याकडे आहे, तुम्हाला जमत नसेल तर ते आम्ही करतो. त्यासाठी पहिल्यांदा जातनिहाय जनगणना करावी लागेल, त्यानंतरच हे सर्व प्रश्न सुटू शकतील. मात्र, पंतप्रधान मोदी तयार नसल्याने हा वाद संपणारच नाही, असा टोलाही पटोले यांनी लगावला. या वादात सरकारच पेट्रोल टाकत असल्याची परिस्थिती आपण पाहत आहोत. देवेंद्र फडणवीस यांनी 2014 मध्ये मराठा समाजाला आरक्षण देतो असे सांगितले होते, मग द्या आता, असेही पटोले यांनी म्हटले. तर, यावर मार्ग आहे, मात्र या सरकारला मार्गच काढायचा नसल्याचा आरोपही पटोले यांनी केला.





