Pune District : ‘जय भवानी’ची धुरा नलवडे-निंबाळकरांकडे
Pune District : सभासदांची एकजूट आणि संस्थेवरील विश्वासाचे प्रतीक ठरलेल्या या बिनविरोध निवडीमुळे पंधारवाडी परिसरात समाधानाचे वातावरण आहे.

इंदापूर : पंधारवाडी (ता. इंदापूर) येथील जय भवानी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या सन 2026 ते 2031 या कालावधीसाठी संचालक मंडळाची निवड बिनविरोध झाली. संस्थेच्या चेअरमनपदी नारायण खंडेराव नलवडे, तर व्हाईस चेअरमनपदी सुधीर माधवराव निंबाळकर यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी एस. पी. गोलांडे यांनी निवडीची घोषणा केली.
सभासदांची एकजूट आणि संस्थेवरील विश्वासाचे प्रतीक ठरलेल्या या बिनविरोध निवडीमुळे पंधारवाडी परिसरात समाधानाचे वातावरण आहे. निवडीनंतर नवनिर्वाचित संचालक मंडळाचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. इंदापूर तालुक्याचे सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था कार्यालयाच्या वतीने सहाय्यक निबंधक शिवरकर यांनी नवनिर्वाचित संचालक मंडळाचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
संस्थेचे सचिव नाना बोराटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 31 मार्च 2026 अखेर संस्थेचा वर्ग ‘ब’ असून संस्थेचे भागभांडवल 58 लाख 57 हजार 75 रुपये आहे. संस्थेची सभासद संख्या 574 असून, त्यापैकी 235 सभासद कर्जदार आहेत. सभासदांकडून येणे असलेली कर्जाची रक्कम 5 कोटी 94 लाख 20 हजार 661 रुपये, तर बँकेचे कर्ज देणे 4 कोटी 81 लाख रुपये आहे. संस्थेला सन 2025-26 मध्ये 7 लाख 39 हजार 863 रुपयांचा नफा झाला आहे. संस्थेने सलग पाच वर्षे नफा मिळविला असून, सभासदांना सलग चार वर्षे 10 टक्के दराने लाभांश देण्यात आला आहे. या आर्थिक कामगिरीमुळे संस्थेच्या कारभाराबाबत सभासदांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यावेळी चेअरमन नारायण खंडेराव नलवडे, व्हाईस चेअरमन सुधीर माधवराव निंबाळकर यांच्यासह संचालक दिगंबर दशरथ निंबाळकर, दीपक भगवान रणवरे, अनिल श्रीमंत नलवडे, विठ्ठल पांडुरंग शेंबडे, भारत धनाजी हेगडे, नंदकुमार माणिक कोकाटे, संग्राम राजेंद्र नलवडे, शहाजी दिनकर भोसले, सौ. वैशाली कैलास नलवडे आणि सौ. जयश्री सुनील शेलार यांचा मान्यवर, सभासद व हितचिंतकांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.





