Nagpur : नागपूर जिल्हयातील नरखेड तालुक्यातून एक संतापजनक प्रकार समोर आला असून, एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह ३५ वर्षांच्या व्यक्तीशी लावून देण्याचा प्रयत्न प्रशासनाने हाणून पाडला आहे. एका धार्मिक कार्यक्रमाच्या आडून हा बालविवाह उरकला जात होता, मात्र बाल संरक्षण कक्षाने वेळेवर दाखवलेल्या सतर्कतेमुळे आठवीत शिकणाऱ्या चिमुरडीचे आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचले आहे. धार्मिक कार्यक्रमाच्या नावाखाली विवाहाचा कट – नरखेड तालुक्यातील मालापूर येथे एका धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या गर्दीचा फायदा घेत १५ वर्षांच्या मुलीचे लग्न तिच्यापेक्षा २० वर्षांनी मोठ्या असलेल्या नवरदेवाशी लावण्याची तयारी पूर्ण झाली होती. ही मुलगी अवघ्या आठवीत शिकत आहे. या विवाहाची माहिती मिळताच जिल्हा बाल संरक्षण कक्षाने तातडीने पोलिसांशी संपर्क साधून कारवाईचे नियोजन केले. पोलिसांचा छापा आणि मुलीची सुटका – लग्नाचे विधी सुरू असतानाच कोंढाळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन छापा टाकला. पोलिसांनी भर मंडपातून मुलीला रेस्क्यू केले आणि तिला तातडीने वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. हेही वाचा – जन विश्वास विधेयक 2026 मंजूर! छोट्या चुका आता गुन्हा नाहीत आयोजक आणि नातेवाईकांवर ‘पोक्सो’ अंतर्गत कारवाई – या गंभीर प्रकरणाची दखल घेत प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. याप्रकरणी नरखेड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, संबंधित आरोपींवर बालविवाह प्रतिबंधक अधिनियम आणि पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत कारवाई केली जात आहे. केवळ मुलीच्या कुटुंबीयांवरच नाही, तर या बेकायदेशीर विवाहात सहभागी होणारे आयोजक आणि प्रोत्साहन देणाऱ्या इतर व्यक्तींवरही कायदेशीर बडगा उगारला जाणार आहे. मुलीची रवानगी बालगृहात – सुटका करण्यात आलेल्या मुलीला सध्या सुरक्षिततेसाठी बालगृहात ठेवण्यात आले आहे. तिची वैद्यकीय चाचणी पूर्ण झाली असून, तिच्या पुढील भविष्याचा आणि संरक्षणाचा निर्णय आता बालकल्याण समिती घेणार आहे. या घटनेने ग्रामीण भागात आजही पाय पसरलेल्या बालविवाहाच्या प्रथेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.