Nagpur News : पगार न मिळल्याने कामगाराने पेटवले ट्रक; नागपूरमधील घटना

नागपूर : एका तरुणाने फक्त सहा हजार रुपयांसाठी ट्रान्सपोर्ट कंपनीचे दोन ट्रक पेटवून दिल्याची धक्कादायक घटना नागपूरमध्ये घडली आहे. ही घटना सोमवारी ( दि. २३) ग्रेट नाग रोड परिसरात घडली. आकाश टेकाम असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव असून तो पुर्वी याच ट्रान्सपोर्ट कंपनीमध्ये हमाल म्हणून कामाला होता. पैशांच्या वादातून त्याने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे.
ट्रान्सपोर्ट कंपनीचे सिद्धप्पा ईरिया सोतलोर यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनूसार आकाश टेकाम हा एका ट्रान्सपोर्ट कंपनीत हमाल म्हणून काम करत होता. त्याला दारूचे व्यसन होते आणि त्याची वागणूक ठीक नसल्यामुळे त्याला कामावरून काढले होते. आकाशला त्याचे 6000 रुपये वेतन मिळायचे होते. सोमवारी सकाळी तो दारू पिऊन ऑफिसमध्ये आला. त्याने पैशासाठी मालकाशी वाद देखील घातला. यावेळी त्याला ऑफिसमधून बाहेर काढण्यात आले. पण थोड्या वेळाने तो परत ऑफिसमध्ये आला.
यावेळी त्याने बाटलीत पेट्रोल भरुन आणले होते. त्याने ते सोबत आणलेले पेट्रोल दोन्ही ट्रकवर टाकून आग लावली. यावेळी दोन्ही ट्रक सिद्धप्पा यांच्या ऑफिससमोर उभे होते. आग लागल्याची माहिती मिळताच लोकांनी पोलीस आणि अग्निशामक दलाला बोलविण्यात आले. अग्निशमन दलाने आग विझवली परंतू तोपर्यंत दोन्ही ट्रक जळून खाक झाले होते. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून या प्रकरणी पोलिसांनी आकाश टेकामला अटक केली आहे. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.





