Nagpur News : विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा ! नागपूरच्या खासगी शाळांमध्ये आढळले 580 बोगस शिक्षक

नागपूर : जिल्ह्यातील खासगी प्राथमिक शाळांमध्ये तब्बल 580 शिक्षकांची बोगस पद्धतीने नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच त्यांच्या वेतनापोटी सरकारी तिजोरीला कोट्यवधींचा चुना लावण्यात आल्याचेही समोर आले आहे. याची शिक्षण विभागाने देखील पुष्टी केली आहे. या प्रकरणी तिघांना नागपूर पोलिसांनी अटक केली आहे.
शिक्षण विभागाच्या एका आदेशात हा प्रकार मान्य करण्यात आले आहे. नागपूर जिल्ह्यात खाजगी प्राथमिक शाळांमध्ये बोगस शिक्षकांची भरती केल्याच्या तक्रारीनंतर काही दिवसांपूर्वी नागपूर जिल्हा परिषदेचे वेतन अधीक्षक नीलेश वाघमारे यांना शिक्षण विभागाकडून विशेष आदेश काढत निलंबित करण्यात आले होते.
जिल्हा परिषदेचे वेतन अधीक्षक नीलेश वाघमारे यांचे निलंबनासंदर्भात जे आदेश काढण्यात आले होते, त्यात नागपूर जिल्ह्यामध्ये 2019 पासून 580 प्राथमिक शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी नियमबाह्य पद्धतीने नियुक्त करण्यात आले. तसेच त्यांच्या नियुक्तीला नियमबाह्य पद्धतीने मान्यता देऊन वेतन काढण्यासाठी आवश्यक असलेले शालार्थ आयडी सुद्धा नियमबाह्य पद्धतीने प्रदान करण्यात आले. त्यामुळे बोगस शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अनेक वर्ष नियमबाह्य पद्धतीने वेतन देऊन शासकीय तिजोरीला मोठं नुकसान पोहोचवल्याचे आदेशात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने या संपूर्ण प्रकरणाची एसआयटी चौकशीची मागणी केली आहे. माजी शिक्षक आमदार व महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष नागो गाणार म्हटले की, 2019 ते 22 दरम्यान नागपूर जिल्ह्यात झालेल्या शिक्षकांच्या बहुतांशी नियुक्त्या बेकायदेशीर पद्धतीने कुठल्याही मान्यता शिवाय करण्यात आल्या. त्यापैकी बहुतांशी शिक्षकांचा अस्तित्व फक्त कागदावर असून त्यांच्या नावाने वेतन उचलले जात आहे, असा आरोप गाणार यांनी केला आहे.





