Nagpur School : नागपूरात तीन बोगस शिक्षकांना अटक; अनेकांवर अटकेची टांगती तलवार

Nagpur School – शिक्षण विभागाच्या ऑनलाइन शालार्थ आयडी प्रणालीचा गैरवापर करून बनावट आयडीच्या माध्यमातून राज्य शासनाकडून नियमित वेतन घेतल्या प्रकरणी नागपूर सायबर पोलीसांनी कारवाईला सुरुवात केली आहे. या प्रकरणात आणखी तीन बोगस शिक्षकांना अटक करण्यात आली आहे.
शालार्थ आयडी घोटाळ्यात आतापर्यंत 17 आरोपींना अटक झाली आहे. ही कारवाई शैक्षणिक व्यवस्थेतील ढिसाळपणा आणि संगणकीय गैरवापराचे गंभीर चित्र समोर आणणारी ठरली आहे. बनावट शालर्थ आयडीव्दारे वेतन घेणाऱ्या तीन सहाय्यक शिक्षकांना अटक झाल्याने बोगस नियुक्ती मिळविणाऱ्या शिक्षकांचे धाबे दणाणले आहे.
सतीश पवार, प्रज्ञा मुळे आणि भूमिका नखाते अशी अटक करण्यात आलेल्या बोगस शिक्षकांची नावे आहेत. विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील कनिष्ठ प्रशासन अधिकारी रविंद्र पाटील यांच्या तक्रारीवरून सायबर पोलीस ठाण्यात विविध कलमांनुसार गुन्ह्याची नोंद केली आहे.
या गुन्ह्याच्या तपासादरम्यान अटकेतील आरोपींनी शिक्षण उपसंचालक कार्यालयकडून अधिकृत आदेश प्राप्त नसताना बनावट ड्राफ्ट बनवून त्याद्वारे शालार्थ आयडी मिळवले. त्या बनावट आयडीच्या आधारे त्यांनी आपली नियुक्ती दर्शवून नियमित वेतन घेतले. सतिश पवार यांनी ऑगस्ट 2023 पासून तर प्रज्ञा मुळे आणि भूमिका नखाते यांनी जून 2024 पासून वेतन घेतले आहे.





