Nagpur Bench : दैनंदिन मतभेद म्हणजे मानसिक क्रूरता नव्हे.! पतीची घटस्फोटाची याचिका न्यायालयाने फेटाळली
जोडीदारापैकी एकाला वाटणारी केवळ नाराजी किंवा चीड ही क्रूरता ठरू शकत नाही. क्रूरता अशी असावी की ज्यामुळे एकत्र राहणे वाजवीपणे अपेक्षित नसेल

Nagpur Bench : वैवाहिक संबंधांमधील बदलत्या परिस्थितीनुसार केवळ किरकोळ नाराजी आणि सामान्य मतभेद म्हणजे मानसिक क्रूरता किंवा घटस्फोटाचे कारण ठरू शकत नाही, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. पत्नी आपल्याशी आणि आपल्या आईशी भांडण करते, असा दावा करणाऱ्या एका पतीने दाखल केलेली घटस्फोटाची याचिका न्यायालयाने फेटाळली.
न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फाळके आणि न्यायमूर्ती राज वाकोडे यांच्या खंडपीठाने म्हटले की, क्रूरता अशा स्वरूपाची असावी की ज्यामुळे त्या जोडप्याने एकत्र राहणे वाजवीपणे शक्य किंवा अपेक्षित नसेल. वैवाहिक जीवनातील क्रूरता ही केवळ काही मोजक्या किंवा विलग घटनांवरून ठरवता येत नाही, तर संपूर्ण वैवाहिक आयुष्याचा एकत्रितपणे विचार करणे आवश्यक असते.
आपल्या सभोवतालच्या जीवनात तसेच वैवाहिक कर्तव्ये आणि जबाबदाऱ्यांमध्ये लक्षणीय बदल झाले आहेत. एका प्रकरणातील क्रूरता दुसऱ्या प्रकरणासारखीच असेल असे नाही. आरोप केलेली क्रूरता ही संबंधित व्यक्तींची जीवनशैली किंवा त्यांची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती यांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असू शकते.
तसेच, त्यांची संस्कृती आणि ते ज्या मानवी मूल्यांना महत्त्व देतात, त्यावरही ती अवलंबून असू शकते. कोणत्याही वैवाहिक जीवनात सामान्य भांडणे आणि मतभेद होतच असतात; त्यामुळे क्रूरता, विशेषतः मानसिक क्रूरता, यातील फरक स्पष्टपणे समजून घेणे गरजेचे आहे, असे न्यायालयाने नमूद केले.
केवळ किरकोळ मुद्द्यांवरून केलेल्या क्रूरतेच्या आरोपांचा विचार केला जाऊ शकत नाही. क्रूरतेचे सामान्य आरोप कायद्याच्या दृष्टीने क्रूरता मानले जात नाहीत, ज्या आधारावर विवाह घटस्फोटाचा आदेश दिला जाऊ शकेल. जोडीदारापैकी एकाला वाटणारी केवळ नाराजी किंवा चीड ही क्रूरता ठरू शकत नाही. क्रूरता अशी असावी की ज्यामुळे एकत्र राहणे वाजवीपणे अपेक्षित नसेल, असे न्यायालयाने स्पष्ट केले.





