Nagastra – 1R Drone : भारतीय लष्कराची ताकद वाढणार ! खरेदी करणार ‘इतके’ नागास्त्र ड्रोन

नवी दिल्ली : स्वत:ला अधिक शक्तीशाली आणि सक्षम बनवण्याच्या प्रक्रियेचा भाग म्हणून भारतीय सैन्याने नागास्त्र- १ आर नावाचे ड्रोन खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. सैन्याकडून एकूण ४५० ड्रोन खरेदी केले जाणार आहेत. नागास्त्र-१ हे स्वदेशी विकसित केलेले भारतीय आत्मघाती अर्थात सुसाइड ड्रोन आहे. ते नागपूर येथील सोलर इंडस्ट्रीजची उपकंपनी असलेल्या इकॉनॉमिक एक्सप्लोझिव्हज लिमिटेड (इइएल) द्वारे उत्पादित केले जाते.
नागास्त्र बनवण्यासाठी ८० टक्केपेक्षा जास्त स्वदेशी साहित्य वापरण्यात आले आहे आणि लक्ष्यावर अचूक निशाणा साधण्यात ते अत्यंत सक्षम आहे. या ड्रोनला रात्रीच्या ऑपरेशनच्या वेळी थर्मल कॅमेरा वापरण्याचा पर्यायही उपलब्ध आहे.नागास्त्र-१ आर ड्रोन शत्रूचे बंकर, प्रशिक्षण शिबिरे, लाँच पॅड आणि इतर लष्करी तळांवर हल्ला करण्यासाठी डिझाइन केलेले आहे. हे ड्रोन आपल्या सैनिकांचा जीव धोक्यात न घालता शत्रूशी लढण्यास पूर्णपणे सक्षम आहेत.
स्वत:ला करते नष्ट
नागास्त्र हे एक आत्मघातकी ड्रोन आहे. त्याची काम करण्याची पद्धत इतर ड्रोनपेक्षा खूपच वेगळी आहे. ते शत्रूवर थेट हल्ला केल्यानंतर स्वतःचा नाश करते. नागास्त्रमध्ये एक जीपीएस सिस्टम बसवण्यात आली आहे, ज्याद्वारे ते त्याचे लक्ष्य शोधते आणि ते नष्ट करते. हे ड्रोन हवेत फिरते आणि जीपीएस सिस्टमच्या मदतीने अत्यंत अचूकतेने लक्ष्यावर मारा करते. नागास्त्र ही एक किफायतशीर प्रणाली आहे, ज्यामध्ये लाँचर सिस्टमचा पुन्हा वापर करता येतो.
झाशीजवळील लडाख आणि बाबिनासह विविध ठिकाणी या प्रणालींची चाचणी घेण्यात आली आहे. त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते सैनिकांच्या जीवाला धोका न पोहोचवता हे ड्रोन ४,५०० मीटरपेक्षा जास्त उंचीवर उडू शकते, ज्यामुळे रडारद्वारे ते शोधणे कठीण होते. जर लक्ष्य सापडले नाही किंवा मोहीम रद्द झाली तर ते पॅराशूट वापरून परत बोलावता येते आणि सुरक्षितपणे उतरवता येते.
नागास्त्राचे वजन सुमारे नऊ किलोग्रॅम असते. लष्कराच्या सोयी लक्षात घेऊन ते विशेषतः डिझाइन केले गेले आहे.-त्यात एक विशेष इलेक्ट्रिक प्रोपल्शन सिस्टम आहे, ज्यामुळे त्याचा आवाज ओळखता येत नाही. २०० मीटरपेक्षा जास्त उंचीवर त्याचा आवाज ओळखणे जवळजवळ अशक्य आहे. ते ६० मिनिटे त्याच्या लक्ष्यावर घिरट्या घालू शकते. हे ड्रोन एक किलोग्रॅम वजनाचे वॉरहेड वाहून नेऊ शकते.





