Satara News : पाथरपुंज शाळेत शिक्षण विभागाची याशनी नागराजन यांनी घेतली शाळा

कोयनानगर : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन यांनी कोयना विभागातील दुर्गम व डोंगराळ असणाऱ्या मळे, कोळणे, पाथरपुंज या गावांना भेट देऊन या गावांतील विकासकामांची व शैक्षणिक दर्जाची पाहणी केली. पाथरपुंज गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेला भेट देऊन शाळेचा शैक्षणिक दर्जा व गुणवत्ता तपासताना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी शिक्षण विभागाची शाळा घेतली. पाथरपुंज शाळेतील विद्यार्थ्यांनी मुख्य कार्यकारी अभियंत्यांच्या प्रश्नाला उत्तरे देऊन ग्रामीण भागात दर्जेदार शिक्षण सुरु असल्याचा प्रत्यय दिला.
सह्यादी व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर व बफर झोनमधील दुर्गम व डोंगराळ भागात याशिनी नागराजन यांनी झाडाझडती घेतली. दुर्गम असणाऱ्या नाव (ता. पाटण) या ग्रामपंचायतीने माझी वसुंधरा टप्पा ५.० अंतर्गत केलेल्या उपक्रमांची पाहणी त्यांनी केली. पाथरपुंज शाळेत पहिली ते आठवी विद्यार्थ्यांची उजळणी घेतली. तेथून मळे, कोळणे, गोठणे, भैरवगड परिसरातील जिल्हा परिषद शाळा व तेथील लोकांचे राहणीमान, लोकांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. आरोग्य सेवा सुविधा मेळावा घेण्याची तसेच जनावरांचे लसीकरण घेण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या.
कोयना परिसरातील मेंढेघर अंतर्गत कोंडावळे येथील वळण बंधारा व शेतीसाठी पाइपलाइन करून भात शेती कशी केली जाते याची पाहणी केली. पाणी पूजन करण्यात आले. हेळवाक स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारत बांधकाम कामांची पाहणी केली. अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्याबाबत बांधकाम विभागास सूचना केल्या.
यावेळी गटविकास अधिकारी सरिता पवार, सहाय्यक गटविकास अधिकारी वसंत धनावडे, तालुका वैद्यकीय अधिकारी नवनाथ कांबळे, ग्रामीण पाणीपुरवठा उप अभियंता करपे, प्रभारी गटशिक्षणाधिकारी दीपा बोरकर, शाखा अभियंता संदीप पाटील, व्यवहारे, विस्तार अधिकारी संदीप कुंभार, गोंधळी, पोरे, नितीन पाटील, अमर पवार सूर्यवंशी, अंगणवाडी पर्यवेक्षिका सुतार, केंद्रप्रमुख आनंद चाळके, वाघमारे उपस्थित होते.





