नगर : संतांच्या धार्मिक कार्याएवढेच शंकरराव काळे यांचे योगदान

पुरूषोत्तम महाराज पाटील चिखलीकर
कोपरगाव – कर्मवीर शंकरराव काळे यांना फक्त समाजाची काळजी होती. त्यांच्यासाठी राजकारण फक्त निमित्त होते. समाजाची निष्काम सेवा एवढेच त्याचे ध्येय होते. संतांचे धार्मिक क्षेत्रात जेवढे कार्य असते, तेवढ्याच योग्यतेचे त्यांचे समाजासाठी योगदान असल्याचे गौरोवोदगार ह.भ.प. पुरोषोत्तम महाराज पाटील चिखलीकर यांनी काढले.
शिक्षण, सहकार, कृषी, सामाजिक व राजकीय क्षेत्रात आपल्या कार्य कर्तुत्वाचा अजोड ठसा उमटविणारे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समुहाचे संस्थापक, माजी खासदार कर्मवीर शंकरराव काळे यांच्या 11 व्या पुण्यस्मरणानिमित्त कर्मवीर शंकरराव काळे स्मृती उद्यानात आयोजित कीर्तनरूपी सेवेप्रसंगी चिखलीकर बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, समाजकारण आणि राजकारणाची टक्केवारी राजकीय व्यक्तींकडून सांगितली जात असली तरी प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी मात्र होत नाही. परंतु शंकरराव काळे यांच्यासाठी राजकारण फक्त निमित्त होते.त्यांची समाजाशी बांधिलकी असल्यामुळे त्यांनी 100 टक्के समाजसेवा केली. राजकारणात फक्त समाजाचा विचार केला. फक्त राजकीय क्षेत्रातच नव्हे तर त्यांचा आध्यात्मिक क्षेत्रात देखील त्यांचे मोठे वलय होते. जयंती त्या व्यक्तीची होत नसून त्याने केलेल्या कार्याची व समाजासाठी दिलेल्या योगदानाची जयंती होत असते. त्या व्यक्तीने केलेल्या योगदानाच्या ऋणातून उतराई होण्यासाठी त्या व्यक्तींचे स्मारक व पुतळे उभारले जातात.
शंकरराव काळे यांनी जीवनभर समाजाचा विचार केला. त्यांनी ठरवल असते तर आपल्या स्वमालकीच्या असंख्य शाळा-महाविद्यालय सहजपणे त्यांनी उभारले देखील असते. परंतु गोर गरिबांच्या मुलांना शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी त्यांनी फक्त रयत शिक्षण संस्थेचे हित जोपासत निष्काम सेवा केली.
यावेळी माजी आमदार अशोकराव काळे, गौतम बॅंकेच्या माजी संचालिका पुष्पाताई काळे, स्नेहलता शिंदे, अनिलराव शिंदे, आमदार आशुतोष काळे, जिल्हा बॅंकेच्या माजी संचालिका चैतालीताई काळे, ऍड. प्रमोद जगताप, कर्मवीर शंकरराव काळे मित्रमंडळाचे अध्यक्ष कारभारी आगवन, उपाध्यक्ष नारायणराव मांजरे, ज्येष्ठ नेते बाळासाहेब कदम, पद्माकांत कुदळे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष माधवराव खिलारी, कारखान्याचे उपाध्यक्ष डॉ. मच्छिंद्रनाथ बर्डे, संचालक दिलीपराव बोरनारे, अशोक कारखान्याचे संचालक ज्ञानेश्वर काळे, बाबुराव कोल्हे, संभाजीराव काळे, राजेंद्र गिरमे, अशोक काळे, राष्ट्रवादीच्या युवती अध्यक्षा वैशाली आभाळे, बाजार समितीचे संचालक शिवाजीराव देवकर, रामदास केकाण, पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनराव काळे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगुले आदी उपस्थित होते.





