Nagar : जिल्ह्यात यंदा साखरनिर्मितीत 39 लाख क्विंटलची घट

अहिल्यानगर : ऊसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर कमी असल्याने यंदाच्या गळीत हंगामात तब्बल 27 लाख 68 हजार 663 मेट्रीक टन ऊस कमी पडला असून परिणामी साखरनिर्मितीमध्ये देखील मोठी घट झाली आहे. यंदा तब्बल 39 लाख 51 हजार 551 क्विंटल साखर पोतीचे उत्पादन कमी झाली आहे. एवढेच नाही साखर उतार देखील कमी झाला आहे. यावेळी 8.81 टक्केच उतारा मिळाला आहे.
कारखान्यांच्या आणि पर्यायाने शेतकर्यांच्या उत्पन्नावर प्रतिकूल परिणाम होणार आहे. राज्याचा हंगाम उशिरा म्हणजे 15 नोव्हेंबरला सुरू झाला तरीही 15 मार्चलाच हंगाम आटोपला आहे. यंदा जिल्ह्यात 22 साखर कारखान्यांनी गळीत हंगाम पूर्ण केला. उतार्यात मोठी घट झाल्याने शेतकर्यांच्या एफआरपीवर आणि कारखान्याच्या साखरनिर्मितीवर प्रतिकूल परिणाम होणार आहे. जिल्ह्यात 39 लाख 51 हजार क्विंटलची घटही साखरउद्योगातील अर्थकारणावर मोठा परिणाम करणारी ठरणार आहे.
गेल्यावर्षी सन 2024-25 या गळीत हंगामात जिल्ह्यातील 13 सहकारी व 9 खासगी अशा 22 कारखान्यांनी 1 कोटी 21 लाख 3 हजार 12 मेट्रीक टन ऊसाचे गाळप केले. त्यापासून र् कोटी 30 लाख 52 हजार 578 क्विंटल साखरपोती उत्पादन झाले होते. त्यावेळी साखर उतारा 9.98 टक्के होता. गेल्या हंगामात साखरनिर्मिती देखील मोठ्या प्रमाणावर झाली होती. आणि उतार देखील चांगला असल्याने शेतकर्यांना एफआरपी देखील चांगली मिळाली होती. मात्र यंंदा ऊसाची कमतरता असल्याने ऊसाचे गाळप कमी झाले. त्याचा फटका साखर उत्पादनावर झाला आहे.
सन 2022-2023 या वर्षातील गळीत हंगामात 1 कोटी 24 लाख 89 हजार 924 मेट्रीक टन ऊसाचे गाळप झाले होते. त्यापासून 1 कोटी 20 लाख 6 हजार 483 क्विंटल साखर पोती उत्पादन झाले होते. या दोन वर्षाच्या तुलनेत यंदा मात्र ऊसाचे 1 कोटी 3 लाख 34 हजार 349 मेट्रीक टन गाळप झाले असून त्यापासून 91 लाख 1 हजार 27 क्विंटल साखर पोती उत्पादन झाले आहे. मागील दोन वर्षाच्या तुलनेत यंदा एक कोटी क्विंटलपेक्षाही कमी साखर पोत्यांचे उत्पादन झाले आहे.
ऊसाचे क्षेत्र कमी होत असल्याने अनेक साखर कारखान्यांनी आता ऊसाकडे शेतकर्यांचा कल वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे. शेतकर्यांना बेन व खते उपलब्ध करू दिली जात आहे. चांगले ऊसाचे बेन दिले जात असून शेतकर्यांना प्रशिक्षण देखील देण्यात येत आहे. असे असतांना यंदा ऊसाचे क्षेत्र कमी झाले आहे. ही जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या दृष्टीने चिंतेची बाब झाली आहे.





