संगमनेर, संगमनेर तालुक्यातील सर्व रस्त्यांकरिता माजीमंत्री थोरात यांनी निधी मिळवला आहे. मात्र, राजकीय हेतू ठेवून सत्ताधाऱ्यांनी मागील तीन वर्षापासून सर्व कामे रखडून ठेवल्याने या सर्व रस्त्यांच्या दुरुस्तीसह रखडलेल्या सर्व प्रकल्पांना गती द्यावी,अशी मागणी आ.सत्यजित तांबे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे केली आहे. संगमनेरमधील रस्त्यांचे रखडलेल्या कामांना गती देण्यासाठी मुंबई येथे मंत्री भोसले यांची आमदार सत्यजित तांबे यांनी भेट घेऊन रखडलेल्या कामांना गती देण्याची मागणी केली आहे. तांबे म्हणाले की, माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रत्येक गावाच्या विकासासाठी निधी दिला. अनेक रस्त्यांच्या कामासाठी निधी मंजूर करून घेतला. परंतु मागील तीन वर्षापासून सत्ताधाऱ्यांनी निधी मंजूर करूनही अनेक कामे रखडून ठेवली. यामुळे संगमनेर तालुक्यातील काही रस्त्यांची दुरावस्था झाली. या कामासाठी थोरात यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. मात्र, आता नव्या सरकारने या रस्त्यांची दुरावस्था लक्षात घेऊन तातडीने दुरुस्ती व पुनर्बांधणीसाठी आवश्यक निधीची तरतूद येणाऱ्या बजेटमध्ये करावी. याचबरोबर जुना पुणे – नाशिक महामार्ग शिवाजी पुतळा ते प्रवरा नदी पूल या प्रकल्पासाठी आधी मंजूर केलेल्या पाच कोटी रुपयांची व्यतिरिक्त अधिक निधी मंजूर करून हा रस्ता पूर्ण करावा. याचबरोबर माजी मंत्री थोरात यांनी पाठपुरावा करून सुरू केलेल्या संगमनेर शहरातील म्हाळुंगी नदीवरील साईनगरला जोडणाऱ्या पुलाचे कामही मंद गतीने सुरू असून हेही लवकरात लवकर उच्च दर्जाचे व्हावे, अशी मागणी तांबे यांनी केली. संगमनेरमधील विविध रस्ते व रखडलेल्या प्रकल्पांबाबत मंत्री भोसले यांच्याबरोबर अत्यंत सकारात्मक चर्चा झाली. याबाबत लवकरात लवकर व आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन मंत्री भोसले यांनी तांबे यांना दिले.