Nagar Road Accident : नगर रोडवर भीषण अपघात! भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेत २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू
Nagar Road Accident : विमाननगर एसआरए वसाहतीतील २४ वर्षीय तरुणावर काळाचा घाला; विमानतळ पोलिसांनी ट्रॅक्टर चालकाला घेतले ताब्यात.

Nagar Road Accident – नगर रस्त्यावर वडगाव शेरीत ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी तरुणाचा मृत्यू झाला. हरिबा बन्सीलाल भालेराव ( २४, रा. एसआरए वसाहत, विमाननगर) याचा अपघातात मृत्यू झाला. याबाबत प्रवीण गोकुळ नाईक ( २९, रा. छत्रपती संभाजी चौक, भाजी मंडईजवळ, चंदननगर) याने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दुचाकीस्वार प्रवीण आणि त्याचा मित्र हरिबा हे रविवारी (८ फेब्रुवारी) दुपारी नगर रस्त्यावरुन निघाले होते.
वडगाव शेरीमध्ये सिग्नलपासून काही अंतरावर पाठीमागून आलेल्या भरधाव ट्रॅक्टरने पाठीमागून धडक दिली. दुचाकीवरील हरिबा चाकाखाली सापडल्याने गंभीर जखमी झाला. दुचाकीस्वार प्रवीण फेकला गेला. गंभीर जखमी झालेल्या हरिबा याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर पोलिसांनी ट्रॅक्टरचालक व्यंकटेश लोकेश राठोड ( २८, रा. वडगाव शिंदे, लोहगाव रस्ता) याला ताब्यात घेतले असून, त्याला नोटीस बजाविण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक क्षीरसागर तपास करत आहेत.





