महाराष्ट्रातील नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुकीत महायुतीने मोठा विजय मिळवला आहे. एकूण २८८ जागांपैकी भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला असून, पक्षाने १२० हून अधिक जागांवर विजय मिळवला आहे. त्यापाठोपाठ शिवसेना (शिंदे गट) ५४ तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ४० जागांवर यशस्वी झाला आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीची कामगिरी निराशाजनक राहिली. महाविकास आघाडीत काँग्रेसला ३४, उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेला ८ तर शरद पवार गटाला अवघ्या ७ जागा मिळाल्या. या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची प्रतिष्ठा पुन्हा एकदा पणाला लागली होती. लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अशोक चव्हाणांना अपेक्षित यश मिळाले नव्हते. आता नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुकीतही त्यांच्या बालेकिल्ल्यात भाजपला फारसे यश मिळाले नाही. नांदेड जिल्ह्यात एकूण १३ नगर परिषदा आणि नगर पंचायती आहेत. यापैकी भाजपला केवळ ४ ठिकाणी विजय मिळवता आला. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडून भाजपला मोठ्या अपेक्षा होत्या, मात्र त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. त्यांचा बालेकिल्ला मानला जाणारा भोकर आणि मुखेडचा गड मात्र त्यांनी राखला. इतर अनेक ठिकाणी भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. नांदेडमधील निकाल स्पष्ट झाल्यानंतर अशोक चव्हाण यांनी स्वतः याबाबत प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “मला आनंद आहे की, मी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर माझा मतदारसंघ पूर्णपणे भाजपमय झाला आहे. काँग्रेसमध्ये असताना ज्या नगरपालिका चांगल्या मताधिक्याने जिंकल्या होत्या, त्या आता भाजपने जिंकून आणल्या आहेत. त्या ठिकाणी काँग्रेसला खातेही उघडता आले नाही. तुरळक अपवाद वगळता जिल्ह्यात भाजप चांगल्या स्थितीत आहे. काही ठिकाणी पराभव झाला आहे, मात्र आगामी महापालिका निवडणुकीत आम्ही चांगली कामगिरी करू.” एकूणच, राज्यपातळीवर भाजप आणि महायुतीचा बोलबाला राहिला असला तरी नांदेडसारख्या काँग्रेसच्या पारंपरिक बालेकिल्ल्यात अशोक चव्हाणांना अद्याप पूर्ण यश मिळवता आलेले नाही. आगामी महापालिका निवडणुकीकडे आता सर्वांच्या नजा लागल्या आहेत.