नगर : सलग सुट्यांमुळे नगर-पुणे महामार्ग जाम!

वाहनचालकांकडून नियमांची पायमल्ली
नगर – दिवाळी सुट्टीसाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांच्या वाहनांमुळे नगर-पुणे महामार्गावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. मागील आठवड्यापासून केडगाव ते कायनेटिक चौक या दरम्यानच्या रस्ता वाहनांच्या गर्दीमुळे जाम होत आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा मनःस्ताप सहन करावा लागत आहे.
रोजगारासाठी, तसेच कामधंद्यासाठी पुणे, मुंबईला स्थायिक झालेले विदर्भ, मराठवाडा व खानदेशात येथील कामगार सध्या दिवाळीच्या सुट्यांमुळे गावी निघाले आहेत. या प्रवाशांच्या वाहनांमुळे नगर-पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी होत असून, दहा मिनिटांच्या अंतरासाठी अर्धा ते एक तासाचा वेळ लागत आहे.
दिवाळी, उन्हाळा, तसेच नाताळची सुटी, लग्नसराई किंवा जोडून सुट्या आल्या की नगर-पुणे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ वाढते. त्यात दुचाकी चालकांकडून वाहतूक नियमांची सर्रास पायमल्ली होत असल्याने अनेकदा अपघात होतात. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी रेल्वे उड्डाणपुलावर एसटी महामंडळ बस नादुरुस्त झाल्याने वाहनांच्या दोन किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या. त्यामुळे वाहतूक पोलिसांसह एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे चांगलीच दमछाक झाली.
केडगाव बायपासवरून सुरू झालेली वाहतूक कोंडी, अंबिकानगर, केडगाव, कायनेटिक चौकापासून नगर शहरातही कायम आहे. नगर शहरामधून बाहेरून जाणारा बाह्यवळण रस्ता, लिंक रोड, तसेच इतर उपरस्त्यांवरही वाहनांची वर्दळ वाढली आहे. तसेच शेंडी बायपास रस्त्यावरही अवजड वाहने वाहतूक वळवल्याने या रस्त्यावरही वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. अत्यवस्थ असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांचा जीव टांगणीला लागतो. वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी पोलीस दलाने मनुष्यबळ पुरविण्याची गरज आहे.
कोंडीत अतिक्रमणांची भर…
नगर-पुणे महामार्गालगत व्यावसायिकांनी व्यवसायासाठी पक्की बांधकामे करून अतिक्रमण केले आहे. अंबिकानगरजवळ भरणारा भाजीबाजार तर थेट महामार्गावरच आला आहे. पुण्याकडून येणाऱ्या भरधाव वाहनांमुळे जीवितहानी होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनाकडून या अतिक्रमणांबाबत डोळेझाक होत असून, ही अतिक्रमणे काढली तर वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत होणार आहे.





