नगर : ‘त्या’ तीन गावांच्या सातबारावरील एमआयडीसीचे शिक्के हटविणार

पारनेर – सुपा येथे उभारण्यात येत असलेल्या औद्योगिक वसाहतीसाठी अधिग्रहित करण्यात आलेल्या वाघुंडे बुद्रुक, अपधूप व पळवे खुर्द येथील शेतकऱ्यांच्या सात बारावरील एमआयडीसीचे शिक्के काढण्याचे आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नुकतेच दिली. मंत्रालयात आमदार नीलेश लंके यांच्यासह शेतकऱ्यांचे प्रतिनिधी वाघुुंडे बुद्रुकचे उपसरपंच दत्ता दिवटे, किरण रासकर यांनी भेट घेऊन शिक्के दुर करण्याची मागणी केली. दरम्यान, मंत्री सामंत यांनी पुढील महिन्यात बैठकीचे आयोजन करून हा प्रश्न निकाली काढण्याची ग्वाही यावेळी दिली.
सुपा-पारनेर औद्योगिक क्षेत्रासाठी शासनाच्या वतीने औद्योगिक विकास अधिनियम 1061 च्या तरतुदींनुसार 934.34 हेक्टर आर क्षेत्र अधिसुचित करण्यात येऊन संबंधित शेतकऱ्यांच्या सातबारावर तसे शेरे मारले होते. वाघुंडे बुद्रुक 282.4, पळवे खुर्द 251.56, अपधूप 151.93, म्हसणे 25.23, सुलतानपुर 6.73, बाबुर्डी 216.49 या गावांचा त्यात समावेश होता.बाबुर्डी येथील जमीन धारकांचा भुसंपादनास तीव्र विरोध झाल्याने तेथील भुसंपादनाची कार्यवाही अद्यापही प्रलंबित आहे.
दि.9 मे 2021 रोजी औद्योगिक महामंडळाच्या नाशिक येथील प्रादेशिक अधिकाऱ्यांनी 73.76 हेक्टर आर क्षेत्र भुधारकांच्या मागणीप्रमाणे विना अधिसुचित करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर 2.67 हेक्टर आर क्षेत्रातील भुधारकांनीही मागणी केल्याने 76.33 हेक्टर आर क्षेत्राची उपमुख्य अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दि. 13 जुलै 2021 रोजी स्थळ पाहणी करण्यात आली. वाघुंडे बुद्रुक येथील 51.33 हेक्टर आर, पळवे खुर्द येथील 2.73 हेक्टर आर व अपधूप येथील 18.93 हेक्टर आर असे 72.99 हेक्टर आर क्षेत्रात बागायती जमीन, घरे असल्याने ते विना अधिसुचित केल्यास नियोजनात अडथळा येणार नाही असा अभिप्राय दिलेला आहे.
निर्णय झाल्यानंतरही शेतकऱ्यांच्या जमिनींवरील अधिसुचित करण्यात आलेले शिक्के हटविण्यात आले नसून इतर हक्कामध्ये हा शेरा असल्याने शेतकऱ्यांना त्याचा त्रास होत आहे. शासकीय योजनांचा लाभ, वित्तीय संस्थांचे कर्ज, मिळकत हस्तांतर, उद्योग व्यवसायास बाधा येत असल्याने हे शिक्के हटवावेत अशी आग्रही मागणी आ. लंके यांनी केली. त्यावर पुढील महिन्यात बैठकीचे आयोजन करून हा प्रश्न कायमचा निकाली काढू, अशी ग्वाही दिल्याचे उपसरपंच दत्ता दिवटे यांनी सांगितले.





