नगर : सरकारला जागे करण्यासाठी अंतरवालीत महामेळावा

राहुरी – मराठा आरक्षण लढा आता अंतिम टप्प्यात आहे. हा लढा आता समाजाने हातात घेतलेला आहे. तो लढा कोणीही मोडू शकत नाही. सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी राज्य सरकारला 40 दिवसांची मुदत दिली आहे. सरकारने तोपर्यंत कुठलीही हालचाल केली नाही तर सरकारला पुन्हा जाग करण्यासाठी येत्या 14 ऑक्टोबरला अंतरवाली सराटीत मराठा समाजाचा महामेळावा आयोजित केला असून यासाठी सर्व मराठा बांधवानी उपस्थित रहावे, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले.
जरांगे पाटील राहुरीत आल्यानंतर सकल मराठा बांधवांच्यावतीने ढोल ताशाचा गजर, डीजेच्या निनादात व जेसीबीच्या सहाय्याने पुष्पवृष्टी करत स्वागत केले गेले. आमदार प्राजक्त तनपुरे, युवानेते हर्ष तनपुरे तसेच विविध संस्था, व्यक्ती यांनी जरांगे यांचे स्वागत केले.नगर-मनमाड मार्गावरील विठ्ठला लॉन्स येथे उपस्थित मोठ्या संख्येतीलमराठा बांधवाना यांनी मार्गदर्शन केले.
जरांगे पाटील म्हणाले की, मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. मी मागे हटणारा किंवा मॅनेज होणारा कार्यकर्ता नाही. मराठा आरक्षण मिळवण्यासाठी सर्वानी शांततेच्या मार्गाने आंदोलन करायचे असून कोणीही जाळपोळ सारखे कृत्य करू नका. हे आंदोलन पूर्णतः अहिंसक आहे. आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न काही शक्ती करीत आहेत. आपण सावध रहायलाच हवे.
मराठा व कुणबी एकच असल्याचे पाच हजार पुरावे सापडले आहेत . सरकारचे मला मॅनेज करण्याचे सगळे प्रयत्न हाणून पाडले.
राज्यपालांची परवानगी घेऊन एका दिवसाचे अधिवेशनात कायदा मंजूर करता येतो. ओबीसी आरक्षणात जाती निश्चिती झाली तसेच या आरक्षणातही करा. माझे आंदोलन समाजाने हातात घेतले आहे. ते कोणीही मोडू शकत नाही. आरक्षण घेतल्याशिवाय लढा थांबणार नाही.
मराठा एकीकरण समितीचे देवेंद्र लांबे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. राहुल पेरणे, धनंजय सांळुके यांची यावेळी भाषणे झाली. राजूभाऊ शेटे यांनी आभार मानले.





