Nagar : राहुरी कारखान्यावर जनसेवा मंडळाचा झेंडा

राहुरी : येथील डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये जनसेवा मंडळाचे नेते, बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांच्या नेतृत्वाखालील आघाडीने एकहाती सर्वच्या सर्व २१ जागा जिंकल्या. निवडणुकीत तीन आघाड्या रिंगणात असल्यातरी मतदारांनी ही निवडणूक दुरंगी केली. राजूभाऊ शेटे यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास मंडळाच्या उमेदवारांपेक्षा जनसेवा मंडळ उमेदवारांना दीड ते दोन हजारांहून अधिक मताधिक्क मिळाले. जनसेवा मंडळाचे नेते अरुण तनपुरे यांनी गटातून सर्वाधिक मते मिळवली.
डाॅ. तनपुरे सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक 31 मे रोजी पार पडली. या निवडणुकीची मतमोजणी राहुरी येथील कै. रामदास पाटील धुमाळ महाविद्यालयाच्या क्रीडा हॉलमध्ये पार पडली. या निवडणुकीमध्ये विशेषतः कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांचे जनसेवा मंडळ व राजूभाऊ शेटे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास मंडळ या दोन मंडळामध्ये निवडणूक चुरशीची ठरली तर कारखाना बचाव कृती समितीला या निवडणुकीत मात्र कमी मते मिळाल्याने त्यांना तृतीय क्रमांकावर राहावे लागले.
मतमोजणी सकाळी नऊ वाजता सुरू झाली. ती सायंकाळी साडेसातच्या सुमारास पूर्ण झाली. जनसेवा मंडळाचे सर्व उमेदवार सर्व गटांमध्ये आघाडीवर होते अखेर ही विजय घोडदौड चालू ठेवत जनसेवा मंडळाने हा मोठा विजय प्राप्त केला आहे. सुमारे 2000 ते अडीच हजार या फरकाने सर्व उमेदवार निवडून आले आहे. ब गट मतदार संघातून उभे असलेले उमेदवार व युवा नेतृत्व हर्ष अरुण तनपुरे यांनी या मतदारसंघांमध्ये 188 मतदारांपैकी 128 मतदान मिळून दणदणीत विजय प्राप्त केला आहे. विजयोत्सवात गुलाबी गुलालाबरोबरच भगवा गुलालाची उधळण केली गेली. माजीमंत्री प्राजक्त तनपुरे हे मतमोजणी कक्षात सायंकाळी सहाच्या सुमारास आले. त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. प्रांताधिकारी डॉ. किरण सावंत व तहसीलदार नामदेव पाटील यांनी मतमोजणीचे नियोजन केले. चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कार्यकर्त्यांनी मतमोजणी ठिकाणी मोठी गर्दी केली होती. त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
सभासदांचा जनसेवा मंडळावर विश्वास
लोकभावना गेली सात वर्ष बंद असलेला हा साखर कारखाना कोणत्याही परिस्थितीत सुरू व्हावा, ही सभासदांची प्रबळ भावना दिसून आली. कोणत्याही परिस्थितीत आम्ही तो सुरू करण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन सर्वच मंडळानी दिलेले असले तरी सभासदांना सभापती अरुण तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली जनसेवा मंडळावर निर्विवाद सत्ता देऊन त्यांचेवर विश्वास दर्शविला. हे शिवधनुष्य पेलण्याची जबाबदारी मतदारांनी त्यांच्यावर दिली आहे.
ही निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सर्वच्या सर्व उमेदवार जनसेवाचे निवडून आले. मतदारांचा उत्साह वाखाणण्यासारखा आहे. आम्ही त्यांचा विश्वास सार्थ ठरवू.
– अरुण तनपुरे, जनसेवा मंडळसभासदांचा कौल आम्हाला मान्य आहे. कारखाना बचाव कृती समितीमुळेच कारखाना निवडणूक झाली. सभासदांना आपण खरे मालक आहोत हे प्रकर्षाने लक्षात आले.
– अमृत धुमाळ, कारखाना बचाव कृती समिती
शेतकरी विकास मंडळ सभासदांचा कौल आम्ही स्वीकारला आहे. जनसेवा मंडळाला विजयाच्या शुभेच्छा आहे. कारखाना सुरू करण्याच्यासाठी आमच्या पातळीवर आम्ही सर्व सहकार्य करू. एक वर्षाच्या आत कारखाना सुरू करून कारखान्याच्या ऊस उत्पादक सभासदांना न्याय व कामगारांना त्यांनी न्याय द्यावा.
– राजूभाऊ शेटे, शेतकरी विकास मंडळ
जनसेवा मंडळ विजयी उमेदवार व त्यांनी मिळालेली मते
१:कोल्हार गट
अशोक उऱ्हे – ७३२७
ज्ञानेश्वर कोळसे ६९२३
२:देवळाली प्रवरा गट
अरुण ढुस ५७९१
कृष्णा मुसमाडे ५६५९
भारत वारुळे ५५७३
३:टाकळीमिया गट
मीना करपे ६१०७
ज्ञानेश्वर खुळे ५९५९
ज्ञानेश्वर पवार ५२७४
४: आरडगाव गट
प्रमोद तारडे :६२४९
वैशाली तारडे :६७११
सुनील मोरे :६७८६
५:वांबोरी गट
किसन जवरे :७४२४
भास्कर ढोकणे : ७३३३
६: राहुरी गट
जनार्दन ऊर्फ गणेश लक्ष्मण गाडे -6674
अरुण तनपुरे-6947
अनुसूचित जाती जमाती
अरुण नानासाहेब ठोकळे-७२३६
९:महिला प्रतिनिधी
सपना भुजाडी -6786
जनाबाई सोनवणे -6565
इतर मागास प्रवर्ग
रावसाहेब यादव तनपुरे-7137
विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग
अशोक तमनर-7587





