नगर : कंपनीच्या सांडपाण्यामुळे आरोग्य धोक्यात

ग्रामपंचायतीसह मनसेकडून कंपनी बंद करण्याचा इशारा
पारनेर – तालुक्यातील सुपा एमआयडीसीच्या माध्यमातून औद्योगिक वसाहतीमधील सर्रास कंपन्यांमध्ये निघालेले केमिकल युक्त तसेच दूषित सांडपाण्याचे योग्य प्रकारे नियोजन होत नसल्याने सुपा परिसरातील शेती व्यवसायासह नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
जुन्या औद्योगिक वसाहतीमधील कार्ड कंपनीच्या माध्यमातून केमिकल युक्त पाणी बाहेर जमिनीवर सोडल्याने आसपासचे पिके जळाले असून तेच पाणी सुपा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावात उतरल्याने पुढील काही दिवस शहरासाठी होणारा पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने केला आहे.
सुपा ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व मनसेचे नेते अविनाश पवार, सुपा पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी कंपनीची पाहणी केली असता गंभीर बाब समोर आली आहे. कार्ड कंपनीने केमिकल युक्त सांडपाण्याचे योग्य प्रकारे नियोजन न करता ते पाणी बाहेर सोडून देण्यात आले. या सांडपाण्यामुळे सुपा गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीसह, तलावातील पाणी दूषित होऊन तलावात सोडलेले मासे मरून दुर्गंधी पसरली आहे. आसपासच्या विहिरीसह बोरवेलचे पाणी दूषित झाले आहे.
परिसरातील शेतातील मका, तुर पीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कंपनी व्यवस्थापनाने चूक मान्य केली नाही. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने व सुपा ग्रामपंचायतच्या वतीने आक्रमक पवित्रा घेऊन कंपनी तत्काळ बंद करण्यात यावी, याबाबतचे निवेदन पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी व कंपनी व्यवस्थापनाला देण्यात आले. यावेळी पदाधिकारी उपस्थित होते.
सुपा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीसह तलावात कंपनीच्या वतीने केमिकल युक्त सांडपाणी सोडण्यात आले आहे. यामुळे तलावात सोडलेले मासे मरण पावले आहेत. पाणी दूषित झाल्यामुळे पुढील काही दिवस पाणी पुरवठा बंद केला जाणार आहे. लवकरच यावर उपाय करण्यात येईल.
मनिषा रोकडे, सरपंच





