Nagar: माजी आमदार अरुण जगताप यांचे निधन

अहिल्यानगर : विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून दोनवेळा आमदार झालेले नगर शहरातील ज्येष्ठ नेते माजी आमदार अरुणकाका बलभीमराव जगताप (वय 66) यांचे शुक्रवारी (2 मे) पहाटे निधन झाले. सायंकाळी पाच वाजता येथील अमरधाम स्मशानभूमी येथे हजारो शोकाकुल जनसमुदायाच्या उपस्थितीत त्यांच्या पार्थिव देहावर शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सर्वांनी साश्रूनयनांनी आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप दिला. यावेळी वातावरण खूप भावनिक झाले होते.
मेंदूतील रक्तस्त्रावामुळे गेल्या 5 एप्रिल रोजी जगताप यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. तब्बल 28 दिवस त्यांनी मृत्यूशी दिलेली झुंज अखेर अपयशी ठरली. उपचार सुरु असतानाच शुक्रवारी (दि. 2 मे) पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी पार्वतीबाई, मुलगी डॉ.वंदना फाटके, मुलगा माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप व अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी ना.अजितदादा पवार गटाचे आमदार संग्राम जगताप तसेच सुना, नातवंडे असा परिवार आहे.
पुण्याहून त्यांचे पार्थिव सकाळी पावणे बारा वाजता नगरला आणण्यात आले. त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. वारकरी संप्रदाय जपणारे स्व. अरुणकाका जगताप यांनी अनेक वर्ष पायी पंढरपूर दिंडी काढून विठ्ठलाची सेवा केली. त्यांच्या निधनाने पूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. दुपारी त्यांच्या निवासस्थानावरून अंत्ययात्रा काढण्यात आली. फुलांनी सजविलेल्या वाहनातून ही अंत्ययात्रा काढली.
त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी पाच वाजता अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी सर्व क्षेत्रातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या निधनाचे वृत्त समजल्यावर नगर शहरातील बाजारपेठेत व्यावसायिक व व्यापार्यांनी व्यवसाय बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.





