नगर : ‘कुकडी’ देणार 2600चा पहिला हप्ता

माजी आ. राहुल जगताप यांची घोषणा
श्रीगोंदा – शेतकऱ्यांच्या घामाचे दाम देण्यात कुकडी कारखाना मागे राहणार नसल्याची ग्वाही देत या गाळप हंगामात 2 हजार 600 रुपयांचा पहिला हप्ता देण्याची घोषणा कुंडलिकराव जगताप कुकडी कारखान्याचे अध्यक्ष राहुल जगताप यांनी केली.
कुकडी कारखान्याच्या 20व्या गाळप हंगामाचा शुभारंभ सोनाली शिंदे, हसिना शेख, रंजना काळे, शालन कांबळे, नर्मदा गिरमकर, मोहिनी म्हस्के, सुमन वीर, पुष्पा गुंड, शोभा घुटे, सिताबाई तळेकर या शहीद वीरांच्या पत्नी – मातांच्या शुभहस्ते करण्यात आला. तर प्रियंका जगताप, रेखा शिंदे, कमल निंभोरे, पुष्पा घाडगे, सुरेखा इथापे व मंगल पवार यांच्या हस्ते बॉयलर अग्निप्रदिपन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना राहुल जगताप म्हणाले, साखर कारखानदारीत ऊसाची व भावाचीही स्पर्धा वाढत आहे. कुकडी सहकारी साखर कारखान्याने नेहमीच शेतकऱ्यांना आधार देण्याचे काम केले. अडचणीच्या काळात सहकारी कारखानेच शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. त्यामुळे शेतकऱ्यांनीही सहकारी कारखानदारीच्या अडचणीत तिच्यामागे उभे राहिले पाहिजे. मागील गाळप हंगामात कारखान्याने प्रतिटन 2 हजार 611 रुपयेप्रमाणे पैसे शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर वर्ग केले आहेत.
कारखान्याचे उपाध्यक्ष विवेक पवार, ओम गुरुदेव महिला पतसंस्थेच्या अध्यक्षा डॉ. प्रणोती जगताप, जालिंदर निंभोरे, संभाजी देवीकर, बाळासाहेब उगले, विमल मांडगे, नारायण जगताप आदी उपस्थित होते. कार्यकारी संचालक एस. वाय. महिंद यांनी प्रास्ताविक केले. मोहन आढाव यांनी सूत्रसंचालन केले तर विष्णू जठार यांनी आभार मानले.





