नगर – गरिब कुटुंबांची दिवाळी होणार गोड

नगर – जिल्ह्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना मागील कोट्यातील जून, जुलै, ऑगस्ट अशी तीन महिन्यांची शिल्लक साखर स्वस्त धान्य दुकानांतून वाटप केली जात आहे. यामुळे गरिब कुटुंबाना एकत्रित तीन किलो साखर मिळणार असून ऐनसणासुदीत मोठा दिलासा मिळाला आहे.
सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये फक्त अंत्योदय रेशनधारकांना प्रति महिना एक किलो साखर २० रुपये या सवलतीच्या दारात दिली जाते. यावर्षी जानेवारी ते मार्च अशी तीन महिन्यांची साखर मिळाली होती. त्यानंतर साखर मिळालेली नाही. परंतु यातील वाटप करुन शिल्लक राहिलेली साखर जून, जुलै, ऑगस्ट अशा तीन महिन्यांचे वाटप करण्याचे निर्देश जिल्हा पुरवठा विभागाने तहसिल कार्यालयांना दिले होते. यानुसार वाटप सुरु करण्यात आले आहेत.
जिल्ह्यात अंत्योदय अन्न योजनेचे ८७ हजार ७०३ रेशनकार्ड असून ३ लाख ८९ हजार १७२ लाभार्थी आहेत. या लाभार्थ्यांसाठी ८९० क्विंटल साखरेची आवश्यकता असते. सध्या तालुकास्तरावरील पुरवठा विभागाच्या गोदामात जानेवारी ते मार्च महिन्यांतील वाटप करुन १२७५.३५ क्विंटल साखर शिल्लक राहिली होती. परंतु वेगवेगळ्या गोदामात कमीजास्त साखर असल्याने काही ठिकाणी असमान वाटप होऊ शकते. प्रशासनाकडून संपूर्ण कोटा आल्यानंतर उर्वरित लाभार्थ्यांना वाटप केले जाणार आहे.
यंदा गौरी-गणपती शिध्याशिवाय
गौरी-गणपती सणाच्या निमित्ताने राज्य सरकारने आनंदाचा शिधा देण्याची घोषणा केली होती. जिल्ह्यात अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांसाठी ६ लाख ५४ हजार ५४४ संच मंजूर झाले होते. २९ लाख ३६ हजार ७०७ लाभार्थ्यंना लाभ होणार होता. परंतु ठेकेदाराने जिल्हा पुरवठा विभागाला वेळेवर शिधा पोहच न केल्याने गौरी-गणपतीमध्ये वाटप होऊ शकले नव्हते.
दोन दिवसांत १०० टक्के वाटप
सध्या जिल्ह्यातील १ हजार ८८७ स्वस्त धान्य दुकानांपैकी १ हजार ७८८ दुकानात आनंदाचा शिधा पोहच झाला असून वाटप सुरु आहे. उरलेल्या ९९ स्वस्त धान्य दुकानांमध्ये पुढील दोन-तीन दिवसांत १०० टक्के आनंदाचा शिधाचा पोहचणार आहे, असे पुरवठा विभागाने सांगितले.
चार तालुक्यातील ९९ दुकानदारांना प्रतिक्षा
तालुका – स्वस्त धान्य दुकान
नेवासा – ११
कर्जत – ५७
जामखेड – २२
पाथर्डी – ९


