माणूसकीचे दर्शन! तृतीयपंथीयांनी गरीब कुटुंबातील मुलीच्या लग्नाचा खर्च उचलला

लातूर – लातूरमध्ये तृतीयपंथियांकडून माणूसकीचे दर्शन झाले आहे. शहरातील काही तृतीयपंथीने एकत्र येत एका मुलीचे कन्यादान केले आहे. लग्नाचा सर्व खर्च उचलत अतिशय थाटामाटात विवाह सोहाळ संप्पन झाला आहे. माताजी नगरमध्ये हा सर्वत्र कुतूहलाचा विषय चर्चिला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लातुरातील माताजी नगर परिसरात कावाले कुटुंब राहते. त्यांची मुलगी पूजाचे आज लग्न लागले. पूजाची आई ही मेस मध्ये पोळ्या करते तर वडील हे लागेल ती कामे करतात. यामुळे घरची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट होती. याची माहिती त्याच भागात राहणाऱ्या तृतीयपंथी प्रिया लातूरकर यांच्या लक्षात आली. या कुटुंबाला काहीतरी मदत करावी या भावनेने प्रिया यांनी ही गोष्ट त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना बोलून दाखवली. सर्व तृतीयपंथीयांनी एकत्र येत आपण पुढाकार घेऊन लग्नाचा खर्च उचलण्याचा निर्णय घेतला.
प्रिया लातूरकर याच्या घरासमोर हलदीचा जंगी कार्यक्रम पार पडला. दुसऱ्या दिवशी मंगल कार्यलयात लग्नविधि पार पडला. या भागातील 450 ते 500 वऱ्हाही या लग्नास हजर होते. प्रिया लातूरकर आणि त्यांचे सहकारी पालकच्या भूमिकेतुन लग्नाची सर्व व्यवस्था पाहत होते. तृतीयपंथी मदत करताहेत हे पाहून त्या भागातील तरूणांनीही मदतीचा हात पुढे केला आणि थाटामाटात लग्न सोहळा पार पडला. तृतीयपंथीयांच्या या कार्याचे लातुरात कौतुक होत आहे.





