Nagar | केटीवेअरच्या संरक्षक भिंतीसाठी २० कोटींच्या निधीस मंजुरी- आ.आशुतोष काळे

कोपरगाव, (प्रतिनिधी): – कोपरगाव मतदारसंघातील विविध कोल्हापूर टाईप बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी निधी मिळावा, यासाठी शासनाकडे सादर केलेल्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली. मतदारसंघातील चार केटीवेअरची संरक्षण भिंत बांधणेसाठी १९.६३ कोटी निधीस महायुती शासनाने प्रशासकीय मंजुरी दिल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली.
अवर्षणग्रस्त असलेल्या कोपरगाव मतदारसंघात सिंचनासाठी पाण्याची निर्मिती करण्यासाठी कोपरगाव मतदारसंघातून वाहणाऱ्या गोदावरी नदीवर शासनाच्या मंजुरीतून ठिकठिकाणी कोल्हापूर टाईप बंधारे बांधण्यात आले आहेत.
या कोल्हापूर टाईप बंधाऱ्यात पावसाळ्यात गोदावरी नदीला वाहून जाणारे पाणी पावसाळयाच्या शेवटी अडवून नदीकाठच्या शेतकऱ्यांना व परिसरातील पाच ते दहा किलोमीटरपर्यतच्या शेतकऱ्यांना देखील शेती सिंचनासाठी मोठ्या प्रमाणात फायदा होवून भूगर्भातील पाणी पातळी वाढण्यास मोठी मदत होत आली आहे.
परंतु जवळपास दोन ते तीन दशकापूर्वी बांधण्यात आलेल्या या बंधाऱ्याच्या बाजूचे भराव पाणी साठविल्यामुळे काहीसे कमकुवत होवून त्याठिकाणी पक्के बांधकाम करणे गरजेचे होते.
जेणेकरून पूर परिस्थितीमुळे पुराचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन शेतकऱ्यांचे नुकसान होवू नये, तसेच या बंधाऱ्यांना कोणतीही हानी पोहोचू नये, यासाठी निधी मिळावा, याबाबत आ. काळे यांचा पाठपुरावा सुरु होता.
या पाठपुराव्याची महायुती शासनाने दखल घेऊन डाऊच केटीवेअरच्या दोन्ही बाजूच्या संरक्षण भिंती, हिंगणी केटीवेअरच्या दोन्ही बाजूच्या संरक्षण भिंती तसेच शिंगवे व पुणतांबा केटीवेअरच्या संरक्षण भिंतीच्या कामासाठी एकूण १९.६३ कोटीच्या निधीस प्रशासकीय मान्यता दिली आहे.
या चार केटीवेअरच्या संरक्षण भिंतीच्या कामासाठी निधी मिळाल्यामुळे पूरपरिस्थितीत निर्माण होणारी आपत्ती सौम्य होणार आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांचे होणारे नुकसान देखील कमी होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आ.काळे यांचे आभार मानले आहे.





