Satara | वाईच्या नागमंदिरात पारंपरिक पद्धतीने नागपंचमी

वाई, (प्रतिनिधी)- शहर व तालुक्यात नागपंचमी उत्सव पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला. नाभिक समाजाचे कृष्णा नदीवरील धर्मपुरी घाटावर पेशवेकालीन प्रसिद्ध दगडी नागोबा मंदिर आहे. येथे दरवर्षी नागपंचमीच्या दिवशी परंपरेने हजारो महिला दर्शनासाठी येतात.
पोवळे बांधून नागोबाचे पूजन करतात. दर्शनानंतर शेजारच्या हरिहरेश्वर मंदिर व धर्मपुरी घाटावर महिलांनी पारंपरिक झिम्मा- फुगडी व इतर पारंपरिक खेळ खेळण्यासाठी गर्दी केली हाेती.
किसन वीर चौकापासून वाईतील प्रमुख रस्ते भाविकांनी गजबजलेले हाेते. पावसाने उघडीप दिलेमुळे शहराला यात्रेचे स्वरूप आले होते. बाल गोपाळांसाठी खेळणी, मिठाई, फुगे वगैरे अनेक प्रकारची दुकाने ठिकठिकाणी थाटण्यात आली होती.
सकाळी दगडी नागोबा मंदिरात वीर जीवा महाले नाभिक संघटना नाभिक समाजाच्यावतीने पारंपरिक पध्दतीने पूजन करण्यात आले. मानकऱ्यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. त्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले.
महिलांच्या अफाट गर्दीमुळे दुपारनंतर केवळ महिलांनाच प्रवेश देण्यात येत होता. संघटनेचे स्वयंसेवक भाविकांना प्रसाद व पोवळे वाटत होते.
परंपरेनुसार नाभिक समाज बांधव सर्व सलून दुकाने बंद ठेवून या उत्सवात सर्वजण योगदान देताना पाहयला मिळाले. संघटनेच्या स्वयंसेवकांनी दर्शनासाठी नियोजन केले हाेते, तसेच सुरक्षेच्या दृष्टीनेही ते काळजी घेत होते.
यावेळी वीर जीवा महाले नाभिक संघटना नाभिक समाज संघटनेचे अध्यक्ष उमेश (महेश) जाधव, संस्थापक अशोकदादा सूर्यवंशी, वाई तालुकाध्यक्ष संपतराव सूर्यवंशी, शहराध्यक्ष निनाद तावरे, मानकरी शांताराम सूर्यवंशी,
अतुल सूर्यवंशी, विकास सूर्यवंशी, शंभू सूर्यवंशी, उत्तम सूर्यवंशी, अमित सूर्यवंशी, दीपक सूर्यवंशी, राजेंद्र सूर्यवंशी, नाना सूर्यवंशी, विजय पप्पू सूर्यवंशी, प्रसाद सूर्यवंशी, स्वप्निल सुर्यवंशी, ओंकार सूर्यवंशी, सुनील तावरे, रमेश सूर्यवंशी,
जीवन चव्हाण, दत्तात्रय सुर्यवंशी, मोहन सुर्यवंशी, अंकुश पवार, विकी पवार, योगेश सूर्यवंशी, विवेक तावरे, अमर सूर्यवंशी, अशोक राऊत, कुणाल तावरे, नितीन सुर्यवंशी, रमेशराव जाधव, रवी क्षीरसागर, सचिन तावरे, ऋषिकेश कदम, अनिल पवार, संतोष तावरे, अमोल तावरे, शंकर सूर्यवंशी,
संजय पवार, सागर सूर्यवंशी, प्रकाश तावरे, अक्षय सूर्यवंशी वगैरे अनेक कार्यकर्ते, समाज बांधव कार्यक्रम पार पाडण्यास कार्यरत होते.
पाेलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली वाई पाेलिसांच्यावतीने कडक बंदाेबस्त ठेवण्यात आला हाेता. तसेच महिला पाेलीसही माेठ्या प्रमाणावर बंदाेबस्तासाठी तैनात करण्यात आल्या हाेत्या.
दुधी हलव्यासाठी गर्दी. . .
वाई व परिसरामध्ये दुधी हलवा खाण्याची परंपरा आहे. परंपरेप्रमाणे मिठाई दुकानदार दुधी हलवा बनवितात. वर्षातून एकदाच दुधी हलवा बनविला जाताे व विक्रीस ठेवला जाताे. दुधी हलवा घेण्यासाठी नागरिकांनी मिठाई दुकानात गर्दी केली हाेती.





