बापरे! पुण्यात घटस्फोटासाठी गेल्या दोन वर्षांत ‘इतकी’ प्रकरणे दाखल

पालकांच्या वाढत्या ढवळाढवळीने संसारात “मिठाचा खडा’
पुणे – कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी दाखल होणाऱ्या अर्जांचे प्रमाण वाढले आहे. आवडी-निवडीतील तफावत, इगो प्रॉब्लेम अशा किरकोळ कारणांमुळे आणि सोशल मिडीयाचा वाढता वापर, आर्थिक अस्थिरता, वास्तवतेचे भान न ठेवता जोडीदारांकडून केलेल्या अवास्तव अपेक्षांमुळे घटस्फोटासाठी अर्ज दाखल होण्याचे प्रमाण वाढले आहे.
ऑगस्ट 2018 ते ऑगस्ट 2020 या कालावधीत येथील कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी 7 हजार 273 दावे दाखल झाले आहेत. त्यापैकी 3 हजार 132 परस्पर संमतीने, तर उर्वरित 4 हजार 273 एका जोडीदाराने घटस्फोटासाठी दावे दाखल केले आहेत. दाखल दाव्यापैंक़ी 5 हजार 394 दावे निकाली काढण्यात आले आहेत. त्यापैकी 1 हजार 901 दावे परस्पर संमतीने झालेले असून, उर्वरित 3 हजार 484 दावे एका जोडीदाराकडून केलेले आहेत.
पूर्वी पत्नीला माहेरहून पैसे आणण्यासाठी लावण्यात येणारा तगादा, सासरच्या मंडळींकडून देण्यात येणारा त्रास, नवऱ्याला असलेले दारूचे व्यसन यासारख्या कारणांनी नात्याला सुरूंग लागायचा. मात्र, आता हे चित्र बदलले आहे. समाजात पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण करण्यात येत आहे. त्यामुळे समाजात बदल झाला आहे. कुटुंब कलहाची आणि नात्याला सुरूंग लागण्याची कारणे बदलली आहेत. प्रतिष्ठा, उशिरा झालेला विवाह, ऐष-आरामाच्या वस्तू नसणे अथवा खरेदीपासून मज्जाव करणे, संपत्ती कोणाच्या नावावर ठेवणे, एकमेकास पुरेसा वेळ न देऊ शकणे, सोशल मीडियाचा अतिवापर अशा कारणांमुळे पती-पत्नींमध्ये वाद होत आहेत.
अगदी किरकोळ कारणावरून दोघांत वाद होत आहेत. कपडे कुणी धुवायचे, आवडीची भाजी केली नाही, आवडीचा ड्रेस घातला नाही यासारख्या क्षुल्लक गोष्टींपासून झालेली भांडणेही थेट कौटुंबिक न्यायालयात पोहोचत आहेत. त्यातच पालकांची ढवळाढवळ वाढली आहे. अलीकडच्या काळात अनेकांना एकच अपत्य असते. मग तो मुलगा असो वा मुलगी. असे पालक घटस्फोट वाढवण्यास कारणीभूत ठरल्याचे दिसून येत आहे. तुलाही पगार आहे. “तु लढ, घटस्फोट घेतल्याने काहीही फरक पडणार नाही’ अशी शिकवण ते मुलांना देतात. मुलांना घटस्फोट घेण्यासाठी प्रवृत्त करत असल्याचे दिसून येत आहे. त्यात दोघेही करिअरमागे लागले असून, करिअरपुढे त्यांना नाते गौण वाटते. त्यामुळे घटस्फोटासाठी दाखल होणाऱ्या अर्जांचे प्रमाण वाढले आहे.
संशयीवृत्ती आणि सोशल मीडियाच्या वाढत्या वापराने घटस्फोटासाठी दाखल होणाऱ्या दाव्यांचे प्रमाण वाढले आहे. पूर्वी भारतात पूर्वी एकत्र कुटुंब पद्धत रुढ होती. त्यावेळी पती-पत्नींमध्ये भांडण झाल्यास ज्येष्ठ माणसं समजवायची. पती-पत्नी ज्येष्ठांचा आदर ठेवायची. त्यांचे ऐकूण एकत्र यायचे. मात्र, आता पाश्चिमात्य संस्कृतीच्या अनुकरणामुळे विभक्त कुटुंब पद्धती रुजू होत आहे. किरकोळ कारणांवरून झालेली भांडणे थेट कौटुंबिक न्यायालयात पोहोचत आहेत. हे थांबविण्यासाठी पुन्हा भारतीय संस्कृतीचे अनुकरण केले पाहिजे.
– ऍड. वैशाली चांदणे, अध्यक्ष, दि फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिशन.





