N. Rangaswamy : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी पुद्दुचेरीचा दौरा केला. त्यावेळी पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशाला पूर्ण राज्याचा दर्जा द्यावा, असे साकडे मुख्यमंत्री एन.रंगासामी (N. Rangaswamy) यांनी त्यांना घातले. मोदींच्या हस्ते पुद्दुचेरीतील विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन झाले. त्यासाठी आयोजित सोहळ्यात रंगासामीही सहभागी झाले. त्यांनी पुद्दुचेरीला पूर्ण सहकार्य करत असल्याबद्दल केंद्र सरकार आणि मोदींचे आभार मानले. अर्थात, मनातील एक खंतही त्यांनी उघड केली. पुद्दुचेरीला पूर्ण राज्याचा दर्जा मिळण्याची आस आहे. त्याविषयीची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. केंद्र सरकारला आग्रह करणारे अनेक ठराव विधानसभेने मंजूर केले. विधानसभेने तब्बल १३ वेळा तसे ठराव स्वीकारले आणि केंद्राकडे पाठवले. पुद्दुचेरी राज्य बनावे अशी जनतेची आकांक्षा आहे. आमची मागणी मोदी मान्य करतील अशी आशा वाटते, असे ते म्हणाले. पुद्दुचेरीत रंगासामी यांच्या नेतृत्वाखालील एआयएनआरसी आणि भाजप युतीची सत्ता आहे. त्या केंद्रशासित प्रदेशात लवकरच विधानसभा निवडणूक होईल. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर रंगासामी यांनी मोदींकडे केलेल्या मागणीचे महत्व वाढले आहे.