Duleep Trophy 2025 : एन जगदीशनचे हुकले द्विशतक, साउथ झोन मजबूत स्थितीत; निशांत सिंधूचे विकेट्सचे पंचक

Duleep Trophy 2025 South Zone vs North Zone : बीसीसीआय आयोजित दुलीप ट्रॉफी 2025 च्या पहिल्या उपांत्य फेरीत साउथ झोनच्या फलंदाजांनी नॉर्थ झोनविरुद्ध दमदार कामगिरी केली. बंगळुरुमधील बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्स मैदानावर खेळल्या गेलेल्या सामन्यात साउथ झोनने पहिल्या डावात सर्वबाद 536 धावा केल्या. तमिळनाडूचा स्टार फलंदाज नारायण जगदीशन 197 धावांवर रनआउट झाला आणि अवघ्या 3 धावांनी द्विशतकाला मुकला.
दुसऱ्या दिवसाचा खेळ –
साउथ झोनने दुसऱ्या दिवसाची सुरुवात 3 बाद 297 धावांवरून केली. पहिल्या दिवशी फलंदाजीचा दबदबा कायम ठेवत साउथ झोनच्या फलंदाजांनी दुसऱ्या दिवशीही 88.2 षटकांत 7 गडी गमावून 239 धावा जोडल्या. यामुळे त्यांचा एकूण स्कोअर 536 धावांपर्यंत पोहोचला. नारायण जगदीशनने 352 चेंडूंमध्ये 16 चौकार आणि 3 षटकारांसह 197 धावांची खणखणीत खेळी केली. मात्र, वेगाने धाव घेण्याच्या प्रयत्नात तो रनआउट झाला.
🚨 JAGADEESAN SMASHED A HUNDRED AGAINST NORTH ZONE IN DULEEP TROPHY 2025 🚨
– He Missed Well-Deserved Double Hundred.#njagadeesan | #DuleepTrophy2025 pic.twitter.com/GKfF6doYiI
— CRICKET TALENTS (@_CrickeTalents) September 5, 2025
दिवसाच्या सुरुवातीला साउथ झोनचा कर्णधार मोहम्मद अझहरुद्दीन (11 धावा) अवघ्या दुसऱ्या चेंडूवर भारतीय वेगवान गोलंदाज अंशुल कंबोजच्या गोलंदाजीवर बाद झाला. कंबोजने 24 षटकांत 67 धावा देत 2 महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. त्यानंतर रिकी भुईने नाबाद 54 धावांची खेळी करत संघाला सावरले. त्याने जगदीशनसोबत पाचव्या विकेटसाठी 87 धावांची मजबूत भागीदारी केली. मात्र, जगदीशन रनआउट झाल्याने साउथ झोनला काहीसा धक्का बसला.
हेही वाचा – US Open 2025 Final : महिला एकेरी अंतिम फेरी निश्चित; सबालेंका-अनिसिमोव्हा यांच्यात रंगणार जेतेपदाचा सामना
निशांत सिंधूची प्रभावी गोलंदाजी –
लंचनंतरच्या सत्रात रिकी भुईने आपली खेळी पुढे नेली, पण नॉर्थ झोनचा फिरकीपटू निशांत सिंधूने शानदार गोलंदाजी करत 125 धावांत 5 विकेट्स घेतल्या. त्याने भुईला कर्णधार अंकित कुमारच्या हाती झेलबाद केले. त्यानंतर हैदराबादचा फिरकीपटू तनय त्यागराजनने 58 धावांची खेळी करत संघाला आधार दिला. तमिळनाडूचा वेगवान गोलंदाज गुरजपनीत सिंगने 29 धावा जोडत त्याच्यासोबत आठव्या विकेटसाठी 63 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. या भागीदारीमुळे साउथ झोनचा स्कोअर 500 धावांच्या पुढे गेला.
साउथ झोन मजबूत स्थिती –
नारायण जगदीशनच्या 197 धावांच्या खेळीसह रिकी भुई आणि तनय त्यागराजन यांच्या योगदानामुळे साउथ झोनने नॉर्थ झोनसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. नॉर्थ झोनच्या गोलंदाजांना विशेषतः निशांत सिंधूने चांगली झुंज दिली, पण साउथ झोनच्या फलंदाजांनी त्यांच्यावर मात केली. आता नॉर्थ झोनची फलंदाजी आणि साउथ झोनची गोलंदाजी यांच्यातील लढत सामन्याचा निकाल ठरवेल.





