N.Chandrababu Naidu : तेलुगू भाषेचे संरक्षण करा; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे जनतेला आवाहन

राजमहेंद्री (आंध्र प्रदेश) : नव्या शैक्षणिक धोरणात त्रिभाषा सूत्राचा विषय असल्याने आता आंध्र प्रदेशातही मातृभाषा तेलुगुच्या संरक्षणाचे आवाहन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री नारा चंद्राबाबू नायडू यांनी अनेक प्रश्न सोडवण्यासाठी दोन्ही तेलुगू राज्यांमध्ये समन्वयाची गरज असल्याचे अधोरेखित केले आहे. देशात सर्वोच्च स्थान मिळवण्यासाठी दोन्ही तेलुगू राज्यांमध्ये एकता आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
सोमवारी गुंटूर येथे आयोजित तिसऱ्या जागतिक तेलुगू महासभेत सहभागी होताना, नायडू यांनी गोव्याचे राज्यपाल पी अशोक गजपती राजू यांच्यासमवेत एन. टी. रामाराव यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल त्यांनी आंध्र सारस्वत परिषदेच्या प्रयत्नांची प्रशंसा केली. तेलुगू भाषेचा संदर्भ देत नायडू म्हणाले की, प्रत्येकाने आपल्या मातृभाषेचे संरक्षण केले पाहिजे.
तेलुगू भाषेला प्राचीन भाषा म्हणून मान्यता मिळाली असून, हिंदी, बंगाली आणि मराठीनंतर तेलुगू भाषिक लोकांची संख्या सर्वाधिक आहे. सुमारे दहा कोटी लोक तेलुगू भाषा बोलतात. आपली मातृभाषा जपताना इतरांच्या भाषेचाही आदर करण्याची गरज आहे. आंध्र सारस्वत परिषदेने २०२२ मध्ये भीमावरम येथे, २०२४ मध्ये राजमहेंद्री येथे तेलुगू महासभेचे आयोजन केले होते. आता २०२७ मध्ये मॉरिशसमध्ये तेलुगू महासभेचे आयोजन केले जाईल.
आपल्या भाषेचे आणि संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत. आपल्या तेलुगू भाषेचे संरक्षण केल्यावरच आपल्या संस्कृतीचे संरक्षण होईल, असे नायडू म्हणाले. यावेळी पी. अशोक गजपती राजू, आंध्र प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष चिंताकायला अय्यन्नापात्रुडू, केंद्रीय राज्यमंत्री पेम्मासानी चंद्रशेखर, तेलुगू कवी, लेखक आणि अनेक नेते उपस्थित होते.
तेलुगु भाषेसाठीचे कार्य
१. आपली मातृभाषा तेलुगूमध्ये प्राविण्य असणे आवश्यक
२. एनटीआर यांच्याकडून पोट्टी श्रीरामुलू तेलुगू विद्यापीठाची स्थापना
३. तेलुगू विद्यापीठाचे मुख्य केंद्र राजमहेंद्री येथे
४. तेलुगू लोकांनी सर्वोच्च पदे मिळवावीत





