शिरूरमध्ये एन.ए. प्लॉट घोटाळ्याचा पर्दाफाश; प्रांताधिकाऱ्यांचा बांधकाम, विक्रीवर स्थगिती आदेश

शिरूर- शिरूर-गोलेगाव रोडवरील मार्वल एम्पायर सोसायटीतील गट क्रमांक ३०९/१ मधील २ हेक्टर ४८ गुंठे जमिनीच्या एन.ए. प्लॉट विक्री आणि बांधकामावर प्रांताधिकारी पूनम अहिरे यांनी स्थगिती आदेश जारी केला आहे. या जमिनीवर न्यायालयीन दावा सुरू असताना ५०हून अधिक प्लॉट विक्री झाली असून, नियमबाह्य बांधकामेही सुरू होती. परशुराम पाचर्णे यांच्या अपिलावर प्रांताधिकाऱ्यांनी सर्व कामकाज थांबवण्याचे आदेश दिले.
या प्रकरणात ले-आऊट मंजुरीदरम्यान आयताकृती ऐवजी त्रिकोणी ओपन स्पेस दाखवणे, १५% ऐवजी केवळ ५% अमिनिटी स्पेस ठेवणे आणि नगरपरिषदेच्या चुकीच्या नकाशाला मंजुरी मिळाल्याने घोटाळा उघड झाला. तहसिलदारांनी नियमबाह्य बिनशेती आदेश दिले, तर भूअभिलेख विभागाने चुकीच्या पोटहिस्स्यांच्या नोंदी केल्या. यामुळे अनेक नागरिकांनी एन.ए. ऑर्डर तपासल्याशिवाय प्लॉट खरेदी केले आणि फसवणुकीला बळी पडले.
प्रांताधिकाऱ्यांनी तहसिलदार आणि नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांना कागदपत्रांची पडताळणी करून अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. या घोटाळ्यात मोठे शासकीय अधिकारी अडकण्याची शक्यता असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी वाढत आहे. नागरिकांना न्याय मिळण्याची आशा आहे.





