घोटावडेतील रहस्यमयी हत्येचा कट अखेर उघडकीस ; 13 गुन्ह्यांचा सराईत रिक्षाचालक अटकेत

प्रभात वृत्तसेवा
पौड – पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने घोटावडे (ता. मुळशी) गावच्या हद्दीत टाकून दिलेल्या अनोळखी मृतदेहाचा गुन्हा उघडकीस आणण्यात पुणे ग्रामीण पोलिसांना मोठे यश आले आहे. स्थानिक गुन्हे शाखा व पौड पोलीस स्टेशनच्या पथकाने संयुक्त कारवाई करत सराईत गुन्हेगार सचिन प्रकाश जाधव (वय 41, रा. धनकवडी) याला अटक केली आहे. या खुनात आशुतोष मनोहर वैशंपायन (वय 47, रा. पवई, मुंबई) यांचा बळी गेला आहे. आरोपी सचिन जाधव याला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला 25 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
पौड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी घोटावडे गावच्या हद्दीत गळा व डोक्यावर वार केलेला मृतदेह आढळून आला होता. मृतदेह कुजत असल्याने तो ओळख पटवणे अवघड झाले होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी विशेष पथक स्थापन करून तपासाला गती दिली. घटनास्थळावर सापडलेल्या आधारकार्डाच्या आधारे मृतदेहाची ओळख पटवण्यात आली. तो मुंबईतील रहिवासी परंतु काही दिवसांपूर्वी पुण्यात आलेले आशुतोष वैशंपायन यांचा असल्याचे स्पष्ट झाले.
पत्नी अक्षदा वैशंपायन यांनी सांगितलेल्या माहितीवरून पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, आशुतोष हे 4 सप्टेंबर रोजी पुणे रेल्वे स्थानकावर दिसून आले. तेथून ते रिक्षाने स्वारगेट व नंतर सिंहगड रोड परिसरात गेले होते. संशयित रिक्षाचालकाची चौकशी केली असता तो सचिन जाधव असल्याचे निष्पन्न झाले. तो सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर याआधीच जबरी चोरी, चोरीचे तब्बल 13 गुन्हे दाखल आहेत.
चौकशीत समोर आले की, आशुतोष वैशंपायन दारूच्या नशेत रिक्षामध्ये बसले असताना त्यांच्या एटीएम कार्डाचा वापर करून जाधवने पैसे काढून दिले. त्यातून वैशंपायन यांच्या खात्यात लाखो रुपये असल्याची माहिती मिळताच पैशांच्या लोभापायी त्याने त्यांचा खून करून मृतदेह घोटावडे गावच्या हद्दीत टाकून दिला.या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पौडचे पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ताजीराव मोहिते, संदिप चव्हाण, तसेच पथकातील अनेक अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले.




