म्यानमारमध्ये या वर्षाच्या अखेरीस सार्वत्रिक निवडणुका

बँकॉक : म्यानमारमधील लोकनियुक्त सरकारकडून सत्ता हस्तगत केल्याच्या ४ वर्षांनी लष्करी शासनाने म्यानमारमध्ये निवडणुका घेण्याच्या निर्णयाची घोषणा केली आहे. आगामी १० महिन्यात देशात सार्वत्रिक निवडणुका घेण्यात येतील, असे सरकारी माध्यमांनी लष्करी शासनाच्या नेतृत्वाच्या हवाल्याने म्हटले आहे.
निवडणूक डिसेंबर किंवा जानेवारी २०२६ मध्ये होईल, असे लष्कराचे वरिष्ठ जनरल मिन ऑंग लाईंग यांनी म्हटल्याचे म्यानमारमधून प्रसिद्ध होणाऱ्या वर्तमानपत्राने म्हटले आहे.
बेलारुसच्या सरकारी दौऱ्यावर असताना घेतलेल्या पत्रकार परिषदेत जनरल लाईंग यांनी निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली. म्यानमारमध्ये लष्करी शासन स्थापन झाल्यापासून त्या देशाला फारच कमी मित्र देश उरले आहेत. त्यापैकी बेलारुस हा एक देश आहे. जनरल लाईंग यांनी अलिकडेच चीनचा दौरा पुर्ण केल्यानंतर ते आता बेलारुसमध्ये दाखल झाले आहेत. सार्वत्रिक निवडणुकांमध्ये भाग घेण्यासाठी देशातील ५३ राजकीय पक्षांनी आपापल्या उमेदवारांच्या याद्या यापुर्वीच सादर केल्या असल्याचेही जनरल लाईंग यांनी म्हटले आहे. मात्र निवडणुकांची नेमकी तारीख त्यांनी जाहीर केली नाही.
म्यानमारच्या लष्कराने फेब्रुवारी २०२१ मध्ये आंग सान सू की यांच्या निवडून आलेल्या सरकारकडून सत्ता हस्तगत केली. मात्र देशभरातून या लष्करी शासनाला मोठा विरोध झाला होता. देशाच्या सीमाभागात लोकशाहीवादी संघटनांकडून अजूनही लष्करी शासनाविरोधात उठाव केले जात आहेत. स्यू की यांच्यावर लष्कराने डझनभर खटले दाखल केले असून त्यातील काही प्रकरणात त्यांना २७ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
ऑक्टोबर महिन्यात लष्करी शासनाने मतदारांच्या नोंदणीसाठी जनगणना देखील केली. देशातील ३३० शहरांपैकी केवळ १४५ ठिकाणीच ही जनगणना करण्यात आली. म्यानमारमध्ये माध्यमांना स्वातंत्र्य नाही आणि सू की यांच्या नॅशनल लीग फॉर डेमोक्रसी पक्षाच्या बहुतेक नेत्यांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे लष्कराने नियोजित केलेली निवडणूक मुक्त किंवा निष्पक्ष होणार नाही, असे टीकाकारांनी आधीच म्हटले आहे.





