Myanmar Earthquake Death : मृतांचा आकडा 1644 वर, ‘ऑपरेशन ब्रह्मा’ राबवत भारताने केली मोठी मदत

Myanmar Earthquake Death : म्यानमारमध्ये आलेल्या भीषण भूकंपाने आतापर्यंत 1644 जणांचा बळी घेतला असून, 3408 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. म्यानमार सरकारच्या अधिकृत आकडेवारीनुसार, 139 लोक अजूनही बेपत्ता आहेत. मात्र, काही आंतरराष्ट्रीय संस्थांनी मृतांचा आकडा 10,000 पेक्षा जास्त असण्याची भीती व्यक्त केली आहे. या संकटग्रस्त देशाला मदत करण्यासाठी भारताने ‘ऑपरेशन ब्रह्मा’ सुरू केले असून, भारतीय बचाव पथके अत्यावश्यक सामग्रीसह म्यानमारमध्ये दाखल झाली आहेत.
10,000 मृत्यूंची भीती, थायलंडमध्येही हादरे
युनायटेड स्टेट्स जिऑलॉजिकल सर्व्हे (यूएसजीएस) च्या अंदाजानुसार, म्यानमारमधील मृतांची संख्या 10,000 ओलांडण्याची शक्यता आहे. भूकंपाचा सर्वाधिक फटका मंडाले, बागो, मॅग्वे, शान राज्य, सागाइंग आणि नायपीडाव या भागांना बसला आहे. यंगून-मंडाले महामार्गाचे मोठे नुकसान झाल्याने बचावकार्याला अडथळे येत आहेत. दरम्यान, थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये भूकंपाच्या धक्क्याने 30 मजली इमारत कोसळली, ज्यामध्ये 10 जणांचा मृत्यू झाला.
भारताचा ‘ऑपरेशन ब्रह्मा’चा मानवतावादी पुढाकार
म्यानमारमधील पीडितांसाठी भारताने तातडीने पावले उचलली आहेत. ‘ऑपरेशन ब्रह्मा’ अंतर्गत, 15 टन मदत सामग्रीची पहिली खेप यंगूनला पोहोचली आहे. यामध्ये तंबू, ब्लँकेट, फूड पॅकेट, स्वच्छता किट, जनरेटर आणि औषधांचा समावेश आहे. भारतीय नौदलाची जहाजे INS सातपुडा आणि INS सावित्री 40 टन मदत घेऊन यंगून बंदराकडे रवाना झाली आहेत.
आंतरराष्ट्रीय मदतीचा ओघ
न्यूझीलंडने म्यानमारसाठी दोन दशलक्ष न्यूझीलंड डॉलर्सची मदत जाहीर केली आहे, तर चीन आणि रशियानेही आपली बचाव पथके पाठवली आहेत. म्यानमारमधील या संकटावर जागतिक समुदायाचे लक्ष लागले असून, मदतकार्य वेगाने सुरू आहे.





