‘माझा मुलगा सुपारीसुद्धा खात नाही’, ड्रिंक अँड ड्राइव्हच्या आरोपावर सुरेश धस यांचे स्पष्टीकरण

Sagar Suresh Dhas: बीडच्या आष्टी मतदारसंघाचे भाजप आमदार सुरेश धस यांचा मुलगा सागर धस याच्या कारने झालेल्या अपघातात हॉटेल व्यावसायिक नितीन शेळके (वय 34, रा. पळवे खुर्द, ता. पारनेर) यांचा मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी (7 जुलै) रात्री साडेदहा वाजता अहिल्यानगर-पुणे महामार्गावरील जातेगाव फाटा येथे घडला. याप्रकरणी सागर धस याच्यावर सुपा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, मंगळवारी सायंकाळी त्याची जामिनावर सुटका झाली.
सागर धस याने भरधाव कार (एमएच 23 बीजी 2929) चालवताना नितीन शेळके यांच्या दुचाकीला धडक दिली, ज्यामुळे शेळके यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर सागर आणि त्याच्या सहकाऱ्यांनी शेळके यांना सुपा येथील रुग्णालयात नेले, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर ‘ड्रिंक अँड ड्राइव्ह’चा आरोप झाला, ज्यावर आमदार सुरेश धस यांनी खुलासा केला.
धस म्हणाले, “माझा मुलगा सागर नियमित तपासणीसाठी मुंबईला जात होता. रात्री साडेदहा वाजता सुपा परिसरात नितीन शेळके अचानक रस्ता ओलांडताना गाडीसमोर आले. सागरने त्यांना रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा आधीच मृत्यू झाला. सागरला कोणतेही व्यसन नाही, सुपारीसुद्धा खात नाही. रक्त तपासणी झाली असून, मी कोणताही दबाव टाकलेला नाही.” सुपा पोलिसांनी सागरच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवले असून, तपास सुरू आहे.





